Friday, May 7, 2010

आयुष्य

ते दुखरं आहे...हळवं आहे...
चार पावलांतच खूप ठेचकाळलय...
पण चाललंय...
गरीब, शहाण्या म्हाताऱ्यासारखं चाललंय...

त्याच्या कडे बलदंड स्नायू नाहीत,
धारदार सुळे नाहीत...
जमिनीत मान घालून चरणाऱ्या शेळीसारखं
जन्माला आलंय आणि मृत्यूकडे चाललंय...

आणि तरीही त्याला नाव ठेवायचा हक्क
माझ्यासकट कुणालाच नाही;
कारण माझं म्हणावं असं तेवढंच तर आहे !
मलाच येतो त्याचा खूपदा राग
आणि मलाच येते त्याची खूपदा दया...
डोंगरात हरवलेल्या वासरासारखं
चुकतमाकत आई शोधतंय...

त्याला ना कधी मी बोलणार,
ना हिडीसफिडीस करणार...
एकसंध दिसलाच कधी तर कुशीत घेईन
तोंडावरून हात फिरवेन,
जमेल तेवढी माया देत राहीन...

इनमीन साथ वर्षांसाठी तर आलं असेल बिचारं...
पडून राहील कुठल्यातरी कोपऱ्यात
कुणाच्या अध्यात ना मध्यात...

एवढ्यांची पोटं भरतात रोजच्या रोज
भाकरीचे चार तुकडे काही आकाशाला जड नाहीत !
अखेरचं 'निदान' तर केव्हाच झालंय;
मलाही आहे ठाऊक, त्यालाही आहे माहीत !!

-संदीप खरे

Thursday, May 6, 2010

वाया

कुणाचेच नसतात हक्क कुणावर
पण डोळे भरतातच ना…
'अपेक्षाच करू नये' अशा तरी
अपेक्षा उरतातच ना…
सगळ्यानआधी उरायचे शून्यच
पण जीव जडतातच ना…
हुंदके येतातच ना…
श्वास अडतातच ना…

पाखरे तरी काय…हवेच्या पिशव्याच
पण झाडात घरटी बांधतातच ना…
वाराच तो…दिसत सुद्धा नाही
पण फांद्यांचे झोपाळे हालतातच ना…
वृक्ष एका जागी थांबतातच ना…
उन्हासाठी सावल्या पडतातच ना…

कुणीही गात नसले तरी
सूर असतातच ना…
शांततेचे अर्थ कळायला
आवाज लागतातच ना…
मरणाशिवाय कळणे जगणे अवघड
अन् जगण्याशिवाय मरणे…
उरात हेंदकळण्यापूर्वी मौन
शब्दांच्या छात्या फुटतातच ना…

नाही ग नाही ! असे नसते काही-
इतक्या सहजपणे म्हणायचे 'नाही'…
नाही ग नाही ! इतके सोपे नसते रक्त
जशी फुटून वाया जावी कागदावर शाई…
नाही ग नाही ! ओसाड नाही हे सारे
पावसाचे स्वप्न कधीच वाया जात नाही
सार्‍याला वेळ दे थोडासा पण निश्चित
इथे कुणाला आहे जगण्याची घाई !

- संदीप खरे

Wednesday, May 5, 2010

खोल मुळापाशी

कोणीच नाही विश्वास ठेवत
पण खोल मुळापाशी आहे मी चिवट
किती धावली वादळे, किती फिरले वारे
एक ज्योत बारीकशी ठेवल्येय मी तेवत…

दरवर्षीच धावत येतात काळेसावळे ढग
दरवेळेस बांधायचे धरण तरी काय…!
आभाळाला अर्थ नसतोच मुळी
मग वणवण फिरण्याचे कारण तरी काय ?

किती अर्धे प्रश्न टाकून गेलो मागे
किती काळ बाळगणार खांद्यावरती ओझे ?
दिवसाच्या दिवस तरी होतात हिरमुसलेले खिन्न
संध्याकाळ सुन्न आणि रात्र प्रश्नचिन्ह !

नुसत्याच हालचाली अन् काही कळत नाही
एका 'घुम्म' आवाजाने भरतात दिशा दाही
कोणी विनोद सांगते, म्हणते 'टाळी तरी द्या !
जमिनीवर पडला चेहरा उचलून तरी घ्या !''

समजत का नाही मला ? तरी तेच !
स्वत: च व्हायचे पाय… स्वत: च ठेच !
असे जरी असले तरी असेच असत नाही
काळ काही पत्ते खेळत जागीच बसत नाही

सगळ्यानआधी गृहीत धरतो मी काही गोष्टी
अंदाज खरे ठरतात…एवढ्याच साठी कष्टी !
खरे सांगू? रक्तातच पेरलय काही
म्हणून आघाड्या हरतो…युद्ध हरत नाही !

मस्त जगू, मस्त जेऊ, निवांत रात्री पडू
एवढे ठरवून सुद्धा मग जेव्हा येतेच रडू
रडता रडता सरळ मग आरशापुढे जातो
पाहतो माझेच सोंग आणि खूप हसून घेतो

असा'विनोदी' मुळात मी…स्वत:वरतीच हसत
कोणीच नाही विश्वास ठेवत
पण खोल मुळापाशी आहे मी चिवट….

-संदीप खरे

Tuesday, May 4, 2010

एकदाच

होय, मी बोलतो भरभरून
पण बरेचदा त्यांच्याशी
ज्यांना आवडत नाही असे बोलणे…

मी कोसळतो पाऊस होऊन
पण बरेचदा त्यांच्यावर
ज्यांना आवडतच नाही चिंब होणे…

होय,
मी जगतो त्यांच्यामध्ये
ज्यांना आवडत नाही असे जगणे…


अगदी आदीबिंदुशी
यंत्राचा एकच दाता
एकदाच चुकला आहे कुठेतरी-
-आणि आता बसत नाही
योग्य जागी योग्य काहीच !

-संदीप खरे

Monday, May 3, 2010

मजला माझा कंटाळा...

किती करावा आरशातुनी बघण्याचा चाळा
खूप जाहले ! आला मजला माझा कंटाळा !

कितीक वर्षे किती ऋतूंच्या कानी येत हाका
रोज नव्या आशेची लागण रोज नव्या पंखा
मनि उन्हाळा, गात्रि हिवाळा, दृष्टी पावसाळा...

सरपटण्यातच सार्थक मग हे पंख कसे जडले ?
नक्षत्रांचे हात कशाला माझ्यावर पडले ?
कितीदा विनवू समजून घ्या रे ! मजला सांभाळा !

अर्ध्या रात्री कोण निजेतून किंचाळत उठले ?
गाव फुलांचे होते मग हे ओरखडे कुठले ?
किती सहाव्या अदृश्यांच्या या निर्जन वेळा ?

ऐलतीरावर जरी सोसतो हासूनिया आघात
पैलतीराची साथ चोरटी घमघमते हृदयात !
दाटून येती प्राण जसे ढग झरण्यास्तव गोळा !

-संदीप खरे