Showing posts with label अग्गोबाई ढग्गोबाई. Show all posts
Showing posts with label अग्गोबाई ढग्गोबाई. Show all posts

Monday, February 1, 2010

सुपरमँन सुपरमँन

सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
वरतून चड्डी आतून पँट

अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार
पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो
उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक
रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच
गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर
कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी
अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी
अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

जरी जगाहून भिन्न असे, तरी मनातून खिन्न असे
आदर करती सर्व जरी परी न कोणी मित्र तरी
लांबून कौतुक हे नुसते, कुणी न मजला हे पुसते
जेवण झाले काय तुझे, काय गड्या हे हाल तुझे
दिवस रात्र हे तू दमशी, सांग तरी मग कधी निजशी
उडता उडता असे सुसाट, दुखते का रे मधेच पाठ
एकएकटे फिरताना, विचार करतो उडताना
आत रिकामे का वाटे, कसे वाटते सर्व थिटे
अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत
करुन बसला तोंड लहाऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी
बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान
काय तयाचे रूप दिसे सुर्याचे प्रतिबिंब जसे
शक्ती ही अन् युक्ती ही, तरी अंतरी भक्ती ही
आणि बोलले मग हनुमान....
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
रोनी सी ये सूरत क्यूँ? मित्रा I am proud of you!!
सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू
ऐक एवढे ते अवधान, शक्ती युक्ती चे हे वरदान
त्या रामाने दिले तुला, त्याने बनवले तुला मला
त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम
साथ जरी ना कुणी असे, आत तुझ्या पण राम असे
राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा
त्या रामाचे करूनी ध्यान, चिरंजीव भव सुपरमँऽऽऽऽऽन
चिरंजीव भव ...सुपरमँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

मुंगीबाय मुंगीबाय

मुंगीबाय मुंगीबाय
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
जाता कुठे असता कुठे
आणि खरे तर नसता कुठे
इकडून तिकडे नेता काय
खाता काय पिता काय

दारे खिडक्यांच्या खिंडी
बुरजासम तांब्या भांडी
त्यांच्या मागून या सरकत
रांग उतरते बघ घसरत
कसे समजते मुंगीबाय
कोणी ठेवले कोठे काय
कोठे साखर कुठे रवा
कुठे मिठाई कुठे खवा
कुठे कणीक अन् भात कुठे
कुठे जाम अन् केक कुठे
चॉकलेट ही पापलेट ही
जे जे सांडे संपून जाय

विरोधात जर कुणी आले
समजा त्याचे ग्रह फिरले
अशा धावता सर्व मिळून
झन झन झन घेता चावून
तुमच्या बहिणी जरी काळ्या
गरीबासम त्या भोळ्या
तुमचा झेंडा का हो लाल
मला एवढे सांगून जाल
इतके नेऊन करता काय
बिळात सारे भरता काय
कशास साठा करायचा
जन्म धावूनि सरायचा
जरा सोडूनि या ना काम
कामाच्या नानाची टांग
मुंगीबाय येता काय
निवांत थोडे बसता काय

काय काय हे करशी काय
पळण्यावाचून उपाय काय
कधी ना थांबे माझा पाय
अन् बोलाया वेळच नाय
रांगेमध्ये जन्म जरी
मुळी ना आम्ही दीन तरी
जन्म थोडका काम अफाट
म्हणून अविरत चालू वाट
कामाचे हे आम्हा पिसे
कामामध्ये राम दिसे
जग हे जरी मुंगी म्हणते
हत्तीला मी लोळवते
अधिक बोलणे गरजच नाय

मुंगीबाय मुंगीबाय

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

मी पप्पाचा ढापून फोन

मी पप्पाचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो बोलतय कोण
ए हेलो

आमचे नाव घेलाशेठ
डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो शाजुक तूप
साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

लक्ष्मीबाई मी जोशाघरची
चोरून खाते अंडा बुरजी
वरती कपभर दूध अन् साय
घरात आता कुणी न्हाय
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

मी तर आहे अट्टल चोर
चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार
तारे उरले फक्त हज़ार
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

ढगामधून बोलतोय बाप्पा
चल चल मारू थोड्या गप्पा
बाप्पा बोलतोयस तर मग थांब
सगळ्यात आधी एवढे सांग
कालच होता सांगत पप्पा
तिकडे आलेत आमचे आप्पा
एकतर त्यांना धाडून दे
नाहीतर फोन जोडुन दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट
अर्धीच राहिलीय आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा
गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर
एकटेच गेले केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता
तिकडे पाठव आमचे आप्पा
बाप्पा…बाप्पा बोला राव
सांगतो माझे नाव अन् गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

इल्लू इल्लू पिल्लू

इल्लू इल्लू पिल्लू ग
अजून भलत टिल्लू ग
नाक छोटे तोरा मोठा
गाल रुसून फुल्लू ग

गाल गुबगुब गोरे ग
डोळे लुकलुक तारे ग
हिलवा फ्लॉक लिबिन लाल
कानी निळे झुल्लु ग

चिमने चिमने थिरथिर पाय
घरात राह्यला राजी न्हाय
डोळा चुकवून पळतय हल्लू
पटकन होताय गुल्लू ग

बडबड करणे धंदा ग
पक्का बोबडकांदा ग
हसता कुणी डोळ्यात पाणी
चॉकलेट देता खुल्लू ग

दमदम सारे दमती ग
तरी गमतीने रमती ग
कधी बाबाचा खांदा आणि
कधी आईचा पल्लु ग

स्वर- सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात, परि घरी कुणी नाही

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
आता पुरे ! झोप सोन्या' कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून, परि खेळगडी नाही

दिसे खिडकीमधुन जग सारे, दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी, मुठीमध्ये बोट नाही

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

चम्हालातु चंगतोसा

चम्हालातु चंगतोसा चमी चके चष्टगो
मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो

चटपटआ चगरन चताहो चथेते चकए चजारा
अवतीभवती लोकच लोक काउन गेला बिचारा
चकडेइ चकलो चकडेति चकलो
बोलून बोलून पुरता थकलो
चरतेपू चरतेपू चमलेद चडबडब चरुनक चठओ

चहीका चलबो चमितो चगळेस चकलो चकतातऐ
मनातल काही बोलायला मुळी जागा उरली नाई
चकतातऐ चहे चकतातऐ चते
जे बोलू ते सर्वा कळते
चजाचीरा चलायचीबो चरतीपू चडलीउ चंबबो

चन्हुनम चधलीशो चनीत्या चकए चाषाभा
सगळे त्या ओळखती आता ही च ची भाषा
चपचुपग चन्हुयाम च
आम्ही भाषा च च च
चमचीआ चमचीतु चम्मतग
चळनारक चाहिना चनालाको

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

बुंबुंबा

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

ह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा
कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
त्यास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढग्गाला ऊन्हाची केवढी झळ
थोडी ना थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरा गरा सो सो सूम
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीज बाई अशी काही तोरयामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर छम छम छडी

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बूड बूड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबून बिबून नको थोडा चिक्खल लगाव

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई