Sunday, May 29, 2011

आई घरात नसते तेव्हा...

आई घरात नसते तेव्हा, घरात घरच नसते तेव्हा...
सगळे कसे होऊन जाते कोणी 'स्टॅच्यू' म्हटल्यासारखे...
शेल्फवरचे डबे सगळे होऊन जातात शिळे शिळे...
कढई राहते काकडलेली, फ्रिज म्हणतो 'ऊब दे'
टेप म्हणतो 'माझे गाणे मलाच ऐकू येत नाही'
शोकेसमधल्या वस्तू म्हणतात 'एका जागी गंमत नाही'
सगळे दिवे चालू राहतात फॅनसुद्धा राहतो फिरत
गिझर पोटी राहते भीती 'कोण बंद करील परत ?'
सगळे कपडे ओरडतात 'पाणी द्या, इस्त्री द्या'
शर्टवरची कॉलर म्हणते- 'कोणी माझी काळजी घ्या !'
केरसुणी तर खचून जाते, तिची 'धनिण' नसते आता
कोपऱ्यामधल्या कचरापेटीस दिवस दिवस उपास आता
छतावरचा कोळी म्हणतो -'बांधा घर ! गनिम नाही !'
भिंती म्हणतात, आमच्या आतून घर आहे वाटत नाही !'
धूळ म्हणते 'किती दिवस अशी वेळ शोधत होते !'
घरासकट मनावरती थर थर साचत राहते!...
आई घरात नसते तेव्हा...

घरामधल्या शांततेचा आता तडकत जातो पारा
देवापुढल्या समईचा उतरत जातो अवघा तोरा
माझी कविता म्हणते 'आता तुला डोळ्यात ठेवील कोण ?'
जगासाठी पिसा तू, तुला शहाणा म्हणेल कोण ?'

दाटून यावे दात मळभ आणिक पाउस पडूच नये
तसे कोंडत जाते मन आणिक मिळत नसते वारा !
आई नसते तरीही दिसते सगळी माया उभी परसात
एकाकीपण सांगत राहते -'भिंतींना डोळे असतात !''...
                                 ....आई घरात नसते तेव्हा
                                 घरात घरच नसते तेव्हा...

-संदीप खरे

Saturday, May 21, 2011

गाणे न शिकलेले गुलाम अली

गाणे न शिकलेला गुलाम अली
असू शकतो एखादा न्हावीही
कंगव्यात आलेली गिर्‍हाईकाची बट
रूपकच्या सात मात्रात कापून काढणारा,
व एखादा चांभार
झपतालाच्या पाचव्या मात्रेत
खिळा अचूक चपलेत घुसवणारा...

नशिबाने ज्यांचा हात तंबोऱ्यावर पडूच दिला नाही
असे कितीतरी भटकत असतील रानोमाळ
फुत्कारत फिरणाऱ्या नागसापांसारखे

त्यांची गाणी पडतात विखरून
चांदण्यातल्या मालाच्या छातीवर,
रानातल्या फांद्यांवर, नद्यांच्या लाटांवर...
पण त्यांच्याही छातीत असतो
तोच लखलखणारा सोन्याचा गोळा
तेजाळतो आतून
तोच स्वच्छ, ताजातवाना करणारा स्वयंसिद्ध सूर...
आयुष्याच्या अनवट रागात लीलया संचार करणारी
तीच स्वरांची झिंग...

गाणे न शिकलेले गुलाम अली
गात गात धार काढतात तेव्हा पान्हावते कपिला !
वल्ह्याने लाटा कापतात तेव्हा लाटाळते सरिता...!
मुक्त कंठाने चुंबून घेतात टीपेचे स्वर
तेव्हा डोंगररांगांचे माथे 'वाहवा' म्हणत झुकवतात माथे !

गाणे न शिकलेल्या गुलाम अलींचे स्वर विखुरतात पृथ्वीभर
खऱ्याखुऱ्या प्रार्थनेसारखे पोहोचतात अंतराळात...
लळा लावतात चंद्र सूर्य ताऱ्यांना...अगणित आकाशगंगांना...

बेफिकीर असतात गाणे न शिकलेले गुलाम अली
गाणे म्हणजे काय हे कधीच न कळता
गात गात उठतात
गात गात दिवसांच्या ओट्या भरतात
अन् स्वच्छ छातीने आयुष्य अंगावर घेत
गात गात झोपून जातात...

अजूनही सांताक्लॉजसारखा
वर्षानुवर्ष फिरणारा असदुल्लाखा गालिबचा आत्मा
त्यांच्या श्रांत चेहऱ्यावर
हात फिरवत फिरवत गुणगुणतो-
' खाक में क्या सूरते होंगी कि पीनहा हो गई |
सब कहा कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गई |'

-संदीप खरे

Wednesday, May 11, 2011

तंबोरा

एक तंबोरा होता माझ्याकडे
काळ्या शिसवीचा...चकाकता...
घराण्यात या हातातून त्या हातात वाजत आलेला...
येता जाता कोपऱ्यावर नेहमीच नजर जायची तिथे...

लहानपणी कोणीच हात लावू देत नसे त्याला
पण सांगत कि एक दिवस तुला घ्यायचाय तो हातात...
अन् मलाही होते ठाऊक निश्चित
कि एक दिवस घेणार आहे तो मी हातात...

खूप लक्ष असं दिलंच नाही मी त्याच्याकडे
पण अगदी धूळही बसू दिली नाही त्याच्यावर...
आणि तारा मात्र कटाक्षाने ठेवत आलो सुरात...
कोण जाणे कुठल्या क्षणी मैफिल चालू होईल...
आणि त्या चार तारांवर जन्म लावावा लागेल...!!

बरेच दिवस झाले...बरेच महिने...बरीच वर्षे झाली...
इमारती पडल्या..त्यातील माणसे कोसळली...
ओठांवर प्रौढत्वाची एक काळी लकेर आली...
वेगळ्या प्रकारची पण तारेवरचीच कसरत करत राहिलो...
येता जाता दिसायचा देवघरातल्या नंदादीपासारखा
वाटबघता तंबोरा...त्यावरची खानदानी, हस्तीदंती नक्षी...
हलकेच हात फिरवत म्हणायचो-
'होणार ! एक दिवस मैफिल सुरु होणार...'

घरी आलेले पाहुणेही तंबोरा बघायचे...हळहळायचे...
म्हणायचे- 'आमच्या घरी असा तंबोरा असता तरss...'
- आणि पुढे त्यांच्या कल्पनाच अडायच्या...!!
मी हसायचो...हसायचो फक्त...
तंबोऱ्याच्या जुन्या मैफिलींचा इतिहास सांगताना
त्यांच्यासह माझेही उसळायचे रक्त...

पाहुणे निघून जात...नजरेत ठेवून एक हळहळती सहानुभूती...
मी ही त्यांच्यामागच्या रिकाम्या घरात
छताझुंबरांना साक्ष ठेऊन
गवसणी चढवताना पुटपुटायचो,
होणार...एक दिवस मैफिल सुरु होणार...!!

असे अलगद उगवले मावळले सूर्यचंद्र
कि आठ आठ तासांच्या निजेचे थांबे घेत
कसे झपाटले आयुष्य कळलेच नाही...
फार दिवस खोकला बराच झाला नाही...
तेव्हा सहज वय पहिले...
आणि घाईघाईने येऊन तंबोरा हाती घेतला...
वाटले- याहून कुणी शंकराचे धनुष्य हाती दिले असते
तर बरे झाले असते...!

कोणीच बोलले नाही मग...
ना घर...ना दार...
ना भिंतीवरच्या तसबिरी...ना खालचा गालिचा...
केव्हाच उडून गेलेले असावेत देहातले प्राण
तसा गारठलेला अबोलाच सर्वत्र...सभोवार...
एखादा अटळ...घनगंभीर षड्ज लागून रहावा तसा !
वाट पाहत राहिलेल्या माझ्या शहाणपणाच्या
लक्षात येत गेले हळूहळू
मैफिल कधीच सुरु झाली होती खरं तर...
तंबोऱ्याच्या जन्मापासूनच !!

आता दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे
तिथे फार क्वचित खेळू देतो मी माझ्या मुलाबाळांना...
धक्का लागून तंबोरा फुटला
तर 'मैफिल चालू व्हायला हवी होती'
इतकेही वाटणार नाही त्यांना...

-संदीप खरे