Showing posts with label दिवस असे की. Show all posts
Showing posts with label दिवस असे की. Show all posts

Saturday, January 23, 2010

तुम्ही म्हणाल तसं

माझ बोलणं, माझ चालणं, माझ हसणं, माझ वागणं
ऊन सावलीच्या परि कधी नकोस हवंसं
तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं
हा हा तुम्ही म्हणाल तसं, हो हो तुम्ही म्हणाल तसं

कधी वाटते म्हणावे गीत केवळ आजचे
आणि डोळ्यांच्या तळ्यात दीप सोडावे कालचे
कुणी वाहती तळ्यात, कुणी हळव्या डोळ्यात
दोन्ही कासावीस,हो हो दोन्ही कासावीस
ह्म ह्म तुम्ही म्हणाल तसं,हो तुम्ही म्हणाल तसं

दिसभर आसावलो एका कवडशासाठी
सांज ढळता ढळता ऊन पोचल दाराशी
आता सावलीच्या ओठी येड्या उन्हाची बासरी
गाणं येडपीस, हो हो गाणं येडपीस
हो हो तुम्ही म्हणाल तसं,हो हो तुम्ही म्हणाल तसं

पैलतीर गाठताना आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला पैलतीर ऐलतीर्
जीव कोणत्या काठचा कुन्या नाहीश्या गावचा
आता म्हणाल तसं, हो हो आता म्हणाल तसं
हो हो तुम्ही म्हणाल तसं,हा हा तुम्ही म्हणाल तसं

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

स्वर टिपेचा

स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा
जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या.
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा

देहही नव्हता तपस्वी , जीवही नव्हता कलंदर
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी,
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर ; पावसाचा

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

सरीवर सर..

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडातडा गारगार गरागरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना ओले ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
सरीवर सर..

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

सैरभैर झाला सारा

सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ
अंधारल्या पिंपळाला लागले का खूळ?

दिशा सार्‍या सुन्यासुन्या, कुणी नाही कुणी नाही
पारावर वेडा एक, त्याला सुद्धा कोणी नाही
असायला कोणी नाही, नसायला कोणी नाही
भलेबुरे काहीतरी, बोलायला कुणी नाही
कुणी नाही कुणी नाही कसलीच गाज नाही
पारातल्या पणतीला विझण्याची लाज नाही
तिमीरच्या पायी मग वाजू लगे चाळ

एक एक आला गेला आणि ठेवला पसारा
सुरसूर जोडताना जाहलाच केर सारा
दिस भर खेळायला, मी ग रांधलेली चूल
आता तिमीरत कशी, मीच मला भूल
एक एक श्वास आता तूटनार थोडाथोडा
उद्या इथे पारावर असेल का हाच वेडा
वेडातच रात गेली, वेडात सकाळ

किड्या पाठोपाठ किडे लागे पिंपळाशी रीघ
क्षण पळताच दिन जमे कचर्‍याचा ढीग
कचर्‍याला मोल नाही, कुणी कसे खोल नाही
कसे हात जुळतील, समईत तेल नाही
पिंपळाच्या पानातून तीच जुनी सळसळ
पण पण जपण्याचा तोच जुना जुना चळ
धिसळतो पार सारा,धिसळतो मूळ

स्वर- शैलेश रानडे
संगीत - संदीप खरे
गीत - संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

मन तळ्यात मळ्यात

मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात
मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात

उरी चाहुलींचे मृगजळ
उरी चाहुलींचे मृगजळ
उरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात

इथे वार्‍याला सांगतो गाणी माझे राणी
इथे वार्‍याला सांगतो गाणी
आणि झुळुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अंगालागी हो
भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात

माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा
माझ्या नयनी नक्षत्र तारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

क्षितिजाच्या पार

क्षितिजाच्या पार वेड्‌या संध्येचे घरटे
वेड्‌या संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जाई दूर तशी मनी हूरहूर
रात ओलावत सूर वात मालवते...

आता बोलायाला कोण संगे चालायाला कोण
कोण टाकेल जीवाचे ओवाळून लिंबलोण
पायरीला ठसे दार खुले छत पिसे
कुण्या उडल्या राव्याचे गीत घर भरते...

आता विझवेल दिवा सांज कापऱ्या हातांनी
आणि आभाळाचे गूज चंद्र सांगेल खुणांनी
पडतील कुणी पुन्हा भरतील डोळे
पुन्हा पुसतील पाणी हात थरथरते...

मनी जागा एक जोगी त्याचे आभाळ फाटके
त्याचा दिशांचा पिंजरा त्याच्या झोळीत चटके
भिजलेली माती त्याचे हललेले मूळ
त्याचे क्षितिजाचे कूळ त्या चालवते...

सांज अबोला अबोला सांज कल्लॊळ कल्लॊळ
सांज जोगीण विरागी सांज साजीरी वेल्हाळ
सांजेवर फूल गंध मौनाचा हवेत
दूर लागले गावात दीप फरफरते

स्वर- शैलेश रानडे
संगीत - संदीप खरे
गीत - संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

कसे सरतील सये

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

एवढंच ना?

एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?

आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,
एवढंच ना?

रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
एवढंच ना?

अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,
घराचे भास, अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की

दिवस असे की

दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे, परी मजला गवसत नाही

मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो, परी नाव ठेववत नाही

मम म्हणताना आता हसतो थोड़े, मिठुन घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता, मेघ पालवत नाही

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की