Monday, July 22, 2013

निरोप

कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवटचा लेख (
१)
दुसरीतला एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. पोटात सारखा गोळा येतोय त्याच्या...
डोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी...
आणि आता थोड्याच वेळात पुन्हा घरी जायचंय...
७-८ दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत.
पण खरं सांगायचं तर आल्या दिवसापासून त्याला भीती वाटतेय ती याच क्षणाची..
आजीच्या कुशीत झोपताना, आजोबांची गोष्ट ऐकताना, दंगा मांडताना,
सतत त्याच्या मनात हा नकोनकोसा क्षण कधीचाच ठाण मांडून राहिलाय...
कितीही दुर्लक्ष करून खेळात रमायचा प्रत्यन केला तरी गाण्यामागे तानपुऱ्याचा षडज् लागून रहावा,
तसा हा 'निरोप' सारखा कावराबावरा करत राहिलाय त्याला.
लहानच आहे तो, पण निघताना पाया पडताना आजीचा हात जरा जास्तच मऊ झालाय
आणि आजोबांचे डोळे अजून सौम्य, ओले हे जाणवतंय त्याला. तो रडला नाही निघताना,
पण निरोपाच्या वेळी रात्रीच्या अंधारात सौम्य आवाजात सतत सरसरत राहणारा पाऊस
आणि मनात जे काही होतंय; या दोघांत उगाचच काहीतरी साम्य आहे
असं वाटत राहिलंय त्याला... अजूनही...!

२)
कॅन्सरच्या लास्ट स्टेज पेशंटला तो भेटायला गेला,
तेव्हा ज्यांच्यात तो थेट बघूच शकला नाही असे दोन डोळे वर वर शांत, निरवानिरव केलेले...
पण नीट पाहिले तर 'उन की आँखो को कभी गौर से देखा है 'फराज'? ...
रोनेवालों की तरह, जागनेवालों जैसी' या फराजच्या प्राणांतिक शेर सारखे ते डोळे?
आलेल्यांशी हसताना, बोलताना, उपचार म्हणून उपचार करून घेताना,
निसटणारा प्रत्येक क्षण भरभरून पाहण्याचा प्रयत्न करणारे डोळे...
खूप पहायचं राहून गेलं हे जाणवणारे डोळे...
'गत्यंतर नाही'च्या दगडी भिंतीपलीकडे पाहू न शकणारे डोळे.
त्या डोळ्यांना काय म्हणायचं? निरोप???

( ३)
शेवटचीच भेट दोघांची... उरल्यासुरल्या पुण्याईने मिळालेला ३-४ प्रहरांचा एकांत...
परिस्थिती अशी की आता हे एकमेकांत समरसून जाणं पुन्हा नशिबी नाही हे दोघांनाही उमगलेलं...
आपापली आयुष्यं खांद्यावर घेऊन दोन वाटांनी निघून जाण्यापूवीर् एकमेकांना भरभरून देण्याघेण्याची जीवघेणी धडपड. ही भेट 'मनस्वी' सुद्धा...
'देहस्वी'सुद्धा- पण 'आता पुन्हा कधीच नाही' हे वाक्य घड्याळ्याच्या लंबकासारखं प्रत्येक क्षणावर टोले देत राहतं... स्पर्शाच्या रेशमी मोरपिसांचे चटकेच मनावर उतरतात.

हात दोनच असतात आणि फुलांचे सडे तर अंगभर पसरलेले.
'जन्मभराची गोष्ट ३-४ प्रहरात नाही रे वेचता येत, राजा'- असहाय्य हात सांगत राहतात...
त्यानंतरही खूप दिवस जातात...
तो अजूनही संध्याकाळी गुलमोहराखाली उभा असतो...
आजकाल संध्याकाळही निरोप घेऊन निघून जाते.
तशी ती पूवीर्ही जायची... आताशा त्याला तेही जाणवतं. इतकंच!!

४)
बातमी आल्येय विजेसारखी. ती सुन्न होऊन बसल्येय... पचवताच येत नाहीये...
मांडीवरच्या छोटीला तर कसलाच अर्थ माहित नाहीये... बाबा.. अपघात.. मरण..
काही काही छोटीला कळत नाहीये...
आईच्या गार हातांचा, देहातल्या कंपाचा स्पर्श नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा इतकीच थोडी जाणीव!
रड रड म्हणतायत सारे पण आई रडतच नाहीये...
शेवटी थोड्या वेळानी आई स्वत:शीच पुटपुटते... ''जातो' म्हणून हे दार ओढून गेले,
तेव्हा आमटी ढवळत होते स्वयंपाकघरात... नीट निरोपसुद्धा नाही घेता आला...''
आणि मग तिचं उसासत फुटलेलं रडू!
मांडीवरची छोटी एका क्षणात तिच्याही नकळत मोठी होऊन गेल्येय...

( ५)
कुणाचंही काही नं ठेवलेला... देता येईल तेवढं आयुष्यभर देत राहिलेला म्हातारा...
आयुष्याच्या सरहद्दीपाशी सुद्धा कसा टपोरा, टवटवीत!! म्हणतो- 'देवाजीनं खूप दिलं...
सुखही आणि त्याची चव टिकावी म्हणून दु:खही! देवही झालो नाही आणि दानवही...
माणूस होतो; माणूसपण तेवढं टिकवलं! खेद कसला... खंत कसली!
नाटक थोडं आता पुढे सरकू दे की... एका प्रवेशात आख्खी गोष्ट कोंबायचा आटापिटा कशाला?
आणि शेवटचाच असला, तरी निरोपाचा एवढा आकांत कशाला?' खूप शहाणा आहे म्हातारा...
मरणाच्या रेघेशी स्वत: आयुष्याने निरोप द्यायला यावं इतका लाडका?
सत्यनारायणाच्या पूजेसारखा निरोप मांडून राहिलेला म्हातारा...
त्याला पुढला जन्म कुठला मिळणारे माहित्ये?
बोरकरांसारख्या कुठल्यातरी कवीच्या चिरंजीव कवितेचा...!!

६)
निरोप... कधी क्षणांचा... दिवसांचा.. वस्तूंचा.. वास्तूंचा... माणसांचा.. अवस्थांचा.
प्रसंगी अंगभूत कलांचा.. तर कधी अशा सदरांचा! खूप देऊन जाणारा...
काही घेऊन जाणारा! कितीही बोललो, काहीही केलं तरी जो कायम अर्धवट, अपुराच वाटतो...
तो निरोप! म्हणून तर काही बोलत नाही अधिक...
थांबतो! 'पुन्हा भेटूच' या मनापासूनच्या इच्छेसह!!

-संदीप खरे

1 comment:

  1. I read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
    सांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = visit gruhkhoj .

    ReplyDelete