Thursday, September 1, 2011

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

-संदीप खरे