Friday, August 27, 2010

स्वप्नं-१

ती सगळी स्वप्नं असतात...

राजवाड्यांचे सोनेरी मनोरे नाचतात
हिरवळीतून ससे बागडतात
चित्रविचित्र रंगांचे पक्षी
स्वरांनी कान भारून टाकतात...
तुम्ही हसता खळखळून...काळजीविहीन...
क्षणभर नव्हे...वर्ष...दोन वर्ष...अनेक वर्ष सतत...
त्या आनंदाचे ओझे होते
खांद्याला हवेहवेसे...
पण थांबा!
तुमचे डोळे खाडकन उघडणार असतात
काहीच वेळात-
वस्तुस्थितीच्या आडदांड सोट्याची वेदना
उठवणार असते दचकवून
मगाचची चित्र मान्य आहे सुंदर असतात!
पण ती सगळी स्वप्नं असतात...!!

बधीर पावलांनी विस्कटाल तुमचे शरीर रस्तोरस्ती
आणि कळेनाहीसा होईल स्वप्न आणि सत्यातला फरक
तेव्हा लक्षात ठेवा;
ज्याच्यात चार धुरकट भिंती,
फुटली तर हंबरडा होईल अशी आरोळी,
उन्ह, घाम, निराशा यातल काहीच नसेल
तेव्हा, उरलेली सगळी चित्र स्वप्नं असतात...

ती पहावीच लागतात...
जागेपणी गाडली तर झोपेत; पण दिसत राहतात!
आणि जेव्हा कधी स्वप्नातलीच माणसं
भेटतातही, दिसतातही वस्तुस्थितीत
तेव्हा विषाद वाटणं साहजिकच;
पण थांबा
स्वप्नातल्या माणसांनाही पडतातच स्वप्नं...
कदाचित आपल्या स्वप्नातही येणार नाहीत अशी स्वप्नं...
पण...त्यांच्याहीसाठी स्वप्नंच असलेली स्वप्नं...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment