Thursday, February 17, 2011

हसलो म्हणजे

‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही !…

‘हसलो’ म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
‘हसलो’ कारण शक्यच नव्हते दुसरे काही
‘डोळ्यामध्ये पाणी नव्हते’ ऐसे नाही !

‘हसलो’ कारण तूच कधि होतिस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
‘हसलो’ कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

‘हसलो’ कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
‘हसलो’ कारण तुलासुद्धा ते खरे वाटते !!
‘हसलो’ म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
‘आतुन आलो होतो डवरून’ ऐसे नाही...

‘हसलो’ कारण विज्ञानाची ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
‘हसलो’ कारण हिशेबास मी दमलो नाही
‘हसलो’ कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

‘हसलो’ कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
‘हसलो’ कारण सत्याची मज भीती नाही
‘हसलो’ कारण फसण्याचा धसका नाही...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment