करून करून काळजी माझी, करून करून लाड
दमलात तुम्ही आई बाबा....झोपा जरा गाढ !
मागणार नाही उगाच खाऊ मागणार नाही खेळ
लवकर उठेन, आवरायाला लावणार नाही वेळ
शाळेमध्ये जाईन रोज, सगळा डबा खाईन
अभ्यास करेन, टीव्हीसुद्धा थोडाच वेळ पाहीन
देवापुढे लावीन दिवा...जेवण करीन मस्त
वरण, भात, भाजी, चटणी सगळं करीन फस्त
शेपूचीही भाजी सांगेन-आई, दोनदा वाढ !
वागणार नाही वाईट साईट राखेन तुमचं नाव
माझे आईबाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव !
लवकर लवकर शिकेन आणि लवकर मोठा होईन
बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन
वणवण करतो बाबा त्याचे कमी होईल काम
दमला तो ही; त्याला आता मिळू दे आराम !
भाजी आणेन आईसाठी, लौंड्रीमध्ये जाईन
दोघांनाही फिरायाला गाडीतून नेईन !
आई म्हणेल - हेच का ते कार्ट माझं द्वाड !!
घट्ट मिटा डोळे तुम्हा कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझं मऊ पांघरूण देतो
झालो आता मोठा सांगा छळेल तुम्हा कोण ?
आई-बाबा, तुम्ही आता मुलं माझी दोन !
पाहू नका असे आता नाते झाले नवे
मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे !
का रे बाबा मिशीमध्ये हसतोस असा ?
आई बघा रडू लागे, डोळे तिचे पुसा...
हात जोडे आई; बाबा म्हणतो- लबाड !!
स्वर- शुभंकर कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २
No comments:
Post a Comment