सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !
पापणीत या फडफडणारी
खुळ्या जीवांची फुलपाखरे
वयात येती सूर्यकिरण ते
तुझ्या पापणीत थरथरती जे !
तुझी पापणी दिवसरात्रीच्या
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा
तुझ्या पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे क्षणार्धात त्या
आमुच्यासाठी युगे थबकती !
तुझी पापणी हळवी, अल्लद
तरी आम्हाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक
सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे प्राण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतर्धान !!
-संदीप खरे
No comments:
Post a Comment