तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...
आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...
रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...
तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले ?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे !!
कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय ?
तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...
-संदीप खरे
No comments:
Post a Comment