Monday, April 11, 2011

अन्यथा...

भर दुपारी, भर रस्त्यात, भर गर्दीत
जाणवणारही नाही तुम्हाला त्यांचं अस्तित्व
पण रात्रीच्या निर्जन प्रहरात
एकट्यादुकट्याने रस्त्यावरून फिरताना
अचानक अंगावर येतील ते
दबा धरून बसलेले...
समूहाने धावणारे...
दिसेल तिथे चावणारे !

एकट्यादुकट्यांनो,
तरीही थांबवू नका
अशा काळोख्यावेळीही
रस्त्यावरून फिरण्याचे
अन्यथा
रस्त्याला सवय होऊन जाईल
निर्जन राहायची !!...

-संदीप खरे

Sunday, April 3, 2011

नको करू सखी...

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई ?
माझ्या मरणाची उगा उठेल आवई !

कशासाठी घालायचे काजळ डोळ्यांत ?
गर्द डोहावर राणी पसरेल रात!

कशास द्यायची अशी मुखाला लखाकी ?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटीत लपेटू नको काया धुंदफुंद !
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध !

नको करू सखी असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार !

-संदीप खरे