Tuesday, August 31, 2010

स्वप्न-४

आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक स्वप्नाला
तंगडी धरून आपटावे
असे बरेचदा वाटेल...
पण हे वाटणेही एक स्वप्नच आहे त्याचे काय !

-संदीप खरे

Sunday, August 29, 2010

स्वप्न-३

आयुष्यात मी कष्ट करून
गहाण पडलेले घर मिळवले...
गहाण पडलेले दागिने मिळवले...
गहाण पडलेली अब्रू मिळवली...
पण आयुष्यभर स्वप्नांकडे
गहाण टाकलेला माझा देह
मला कधीही सोडवता आला नाही..

-संदीप खरे

Saturday, August 28, 2010

स्वप्नं-२

स्वप्नं...
मी झोपतो तेव्हा हळूच बाहेर येतात
माझ्या डोळ्यांतून...दमल्या हातांतून...
थकल्या पायांतून...रंध्रारंध्रांतून...
आणि खेळत राहतात माझ्या उशीभोवती...
माझ अंथरूण विस्कटवतात....
माझी उशी खेचतात...
माझ्या घड्याळाचा गजर करतात....
माझ्या झोपेच्या तळ्यात सारी मिळून धिंगाणा घालतात...

मी कण्हतो...कूस बदलतो...हातावरे करून झटकू बघतो...
आणि मग उठतोच
तेव्हा ती झटकन परत शरीरभर जागच्या जागी जाऊन बसतात...
कुणी डोळ्यांत...कुणी हातांत...कुणी पायांत...
मग मी शोधत राहतो-मला जाग का आली?

माझ्या उशी अंथरुणासारखी झोप का विस्कटली ?
आणि उठून सरळ धाव लागतो
दिवसाच्या रिंगणात शर्यतीतल्या घोड्यासारखा...
तेव्हा ती खुदुखुदु हसत राहतात अंगभर
वडाला वसतीला आलेल्या भुतासारखी...

स्वप्नं...
छोटीछोटीच आहेत...गोजीरवाणी...
उचलून घ्यावीत अशी...हसरी...
पण त्यांच्या सुळ्यांना लागलेल
पिढ्यानपिढ्याचं चिकट, गरम रक्त पाहिलंत का?

-संदीप खरे

Friday, August 27, 2010

स्वप्नं-१

ती सगळी स्वप्नं असतात...

राजवाड्यांचे सोनेरी मनोरे नाचतात
हिरवळीतून ससे बागडतात
चित्रविचित्र रंगांचे पक्षी
स्वरांनी कान भारून टाकतात...
तुम्ही हसता खळखळून...काळजीविहीन...
क्षणभर नव्हे...वर्ष...दोन वर्ष...अनेक वर्ष सतत...
त्या आनंदाचे ओझे होते
खांद्याला हवेहवेसे...
पण थांबा!
तुमचे डोळे खाडकन उघडणार असतात
काहीच वेळात-
वस्तुस्थितीच्या आडदांड सोट्याची वेदना
उठवणार असते दचकवून
मगाचची चित्र मान्य आहे सुंदर असतात!
पण ती सगळी स्वप्नं असतात...!!

बधीर पावलांनी विस्कटाल तुमचे शरीर रस्तोरस्ती
आणि कळेनाहीसा होईल स्वप्न आणि सत्यातला फरक
तेव्हा लक्षात ठेवा;
ज्याच्यात चार धुरकट भिंती,
फुटली तर हंबरडा होईल अशी आरोळी,
उन्ह, घाम, निराशा यातल काहीच नसेल
तेव्हा, उरलेली सगळी चित्र स्वप्नं असतात...

ती पहावीच लागतात...
जागेपणी गाडली तर झोपेत; पण दिसत राहतात!
आणि जेव्हा कधी स्वप्नातलीच माणसं
भेटतातही, दिसतातही वस्तुस्थितीत
तेव्हा विषाद वाटणं साहजिकच;
पण थांबा
स्वप्नातल्या माणसांनाही पडतातच स्वप्नं...
कदाचित आपल्या स्वप्नातही येणार नाहीत अशी स्वप्नं...
पण...त्यांच्याहीसाठी स्वप्नंच असलेली स्वप्नं...

-संदीप खरे

Thursday, August 26, 2010

देवा

जरा मानवी स्पर्श होवो तुलाही
जरा आज तू बोल माझ्याकडे
जरा पातळी आज तू गाठ माझी
जरा आज तू धाव धरणीकडे

तुला ऐकू येते मला हे कळू दे
प्रचिती तुझी आज येउच दे
मी पायर्‍या लक्ष आलो चढोनी
तू पायरी एक उतरून ये!

तुला गाठण्याला किती मारल्या मी
उड्या उंच; अस्पर्श तू पाहिला
पहा शुष्क झाल्या दयाळा नद्या या
परी मेघ परकाच रे राहिला!

तुझ्या पायी वर्षे, युगे वाहतो मी
पुरेपूर दु:खांस स्वीकारतो
क्षणास येवो तुझा शब्द ऐकू
तयासाठी घे जन्म भिरकावतो!

जरि बुद्धी खोटी, जरि गर्व मोठा
तरि आत उत्सुकता रे तुझी
कृपाळा, तुझे नाव ऐकून आहे
वेड्या अडाणी तुकोबामुखी!!

-संदीप खरे

Sunday, August 22, 2010

आम्हा गरीबांघरी

आम्हा गरीबांघरी पानापानाचा नव्हे,
घासाघासाचा हिशोब चालतो

पदर आवळून घ्यावा कुळवंताच्या लेकीने
तशा चापूनचोपून घेतो सार्‍या इच्छा
घेरून येताना संध्याकाळचा उत्तान अंधार
सज्जनपनाच्या म्हणत परवचा
क्षीण मिणमिणत्या दिवलीभोवती
प्राणांची ओंजळ धरतो...

दोन वेळ पेटत्या चुलीची धग
वरदान म्हणून स्वीकारतो
लाल केशरी ज्वाळांच्या प्रकाशात
रसरसून उठलेल्या भुकेच्या गाठींमध्ये
जगण्याचा शाप विसरून जातो...

एखाद्याच्या मनीचे आर्त
सहज सन्मानित होते इथल्या भिंतीतून
एखाद्याचे अपयश सहज सहज सामावते
आकाशरंगी मनाच्या अवकाशातून
भेगाळल्या भुईवर पडावे पावसाचे पाणी
तसाच हारल्या पाठीवर थरथरता हात पडतो...

सहज स्वीकारतो आम्ही आमचे चेहरे
लावून घेतो छंद जगात राहण्याचा!
जन्मजात येते जगाकडे त्रयस्थ बघण्याची दृष्टी
श्वासाश्वासाला येतो गंध मुकाट शहाणपणाचा
चंद्रमौळी घराच्या फुटक्या कौलांतून
थेट अंगावर उतरते नियतीचे चांदणे
कुडकुडत्या शरीरांवर
उबदार शालीसारखे तेच नखशिखांत पांघरतो...
आम्हा गरीबांघरी पानापानाचा नव्हे,
घासाघासाचा हिशोब चालतो

-संदीप खरे

Friday, August 13, 2010

मंदी...

मंदीचा काळ...
पसर पसर पसरलेल्या कंटाळवाण्या पिवळट उन्हासारखा
लांबलचक मंदीचा काळ...

चण्याफुटाण्याच्या पैशात बारा बारा चौदा चौदा तास राबवून घ्यावीत
अशा मजबूर मेंढरांचा काळ...
आस्तिकाला नास्तिक आणि नास्तिकाला आस्तिक बनवणारा
काळ्या जादूचा काळ...
उथळांच्या उत्थानाचा, पांडित्यांच्या पतनाचा काळ...
गाणी न सुचण्याचा काळ...कविता न समजण्याचा काळ...
हलकट वातावरणात रोगग्रस्त हवेचा काळ...
पाठीवरल्या कुबडांचा काळ...
हपापलेल्या नजरांसमोर बोलाच्याच कढीभाताचा काळ...
हातापायात लकवा भरण्याचा काळ...
काहीच न कळण्याचा काळ...
आतून आतून उतू जाणार्‍या वांझ शिव्यांचा काळ..
आपण गरीब की श्रीमंत हे न समजण्याचा काळ...
आपण जात्याच की सुपात हे न उमजण्याचा काळ...
वास्तवासमोर वेश्येगत नागडं होऊन जाण्याचा काळ...
खूप खूप कंटाळा येण्याचा काळ...
काहीच न ठरण्याचा काळ...
गार पडत चाललेल्या शिळ्या रक्ताचा काळ...

डबक्यातल्या बेडकांच्या पाठीवरुन
प्रेमाने हात फिरवावा अस वाटण्याचा काळ...
मंदीचा काळ...

-संदीप खरे

Sunday, August 8, 2010

सर्वज्ञ...

तो खूप बोलला काहीबाही...
तो नेहमीच खूप बोलतो
कुणाच्या चित्रावर, खेळावर, संगीतावर, कवितांवर...
आवाजात काकड्या सोलायचं सोलाणं लपवून
तो नेहमीच बोलतो काहीबाही...

त्याला ते समजलं असेल असं नाही...
त्याला ते समजावं असंही नाही...
पण तो बोलतो !!
आणि रात्री झोप लागण्याची खात्री करून घेतो...
तो बोलतो
आणि नावामागे जाढ्यसे 'श्रीयुत' लिहायला मोकळा होतो...

आपण बोलतो ते कदाचित निरर्थक
असे वाटत असेलही त्याला,
पण तो बोलतो ते नक्की निरर्थकच
असं न वाटल्याने
मी मात्र स्वत:वरच चिडत...
गोंधळाच्या जाळ्यावर टणाटणा उड्या मारत...!!

-संदीप खरे