Thursday, April 29, 2010

किती एकटा मी तुझ्यासोबती

पुन्हा कल्पनांची निशा ही निमाली
पुन्हा उन्ह पूर्वेस खोळंबले
पुन्हा कोरडे व्हायचे म्हणोनी
जरा नेत्र हलकेच ओथंबले

मला ठाव होते तुला जायचे ते
क्षणांच्या उरी गोंदुनी या खुणा
तुझ्या उष्ण दु:खाहुनी घोर होता
मनी गारठा हा युगांचा जुना

तुझ्या वेदनांचे जया आत मोती
मनाच्या तळाशी किती शिंपले
किती झाकली मी उरी वादळे ही
तुझे शब्द दु:खात घोंगावले

इथे हीच जागा, अशी हीच वेळा
क्षणांची अशी हीच होती गती
तुझ्यविन आता इथे हिंडताना
किती एकटा मी तुझ्यासोबती

-संदीप खरे

Wednesday, April 28, 2010

हॅंग ओव्हर

सकाळ झाली…
कोवळी कोवळी उन्हे पसरली आहेत परत…
घर आवरतो आहे परत स्वच्छ
पण खरंच 'आवरता' येणार आहे का हे घर ?...

वस्तू पोचल्या आहेत जागच्या जागी
कॅसेट्सच्या जागी पोहोचल्या आहेत कॅसेट्स
आणि 'मी त्यातला नाहीच' असा साळसूद टेप…
जमिनीवर जाणवत आहेत अजुन
घरभर पसरलेल्या उदास गझला…
भिंतीवर चिकटलेल्या,झुंबर झालेल्या…
दारुनी ओलेत्या मनाला
जरा जास्तच बसतो गझलचा शॉक…!!

गच्चीतल्या धुळीत उतरले आहेत
माझ्याच पावलांचे वेडे वाकडे ठसे…
मी इतका अस्ताव्यस्त चाललो?
पण विश्वास ठेवणे भाग आहे !
आता हे नीट झाडून ठेवण्यापूर्वी
फोटो काढून ठेवावा का ह्यांचा?
येती' त्या पावलांचा ठेवतात तसा ?

मला वाटते आहे
की एखादा प्रलय बिलय होऊन
हे सगळे घर, हे सगळे शहर
सगळी संस्कृती गाडली गेली-
आणि कित्येक वर्षानंतर
एखाद्या उत्खननात सापडली,
तर असे आवरलेले घर पाहून
त्यांना कसे वाटेल?
आपले पूर्वज सभ्य होते?
आणि काल रात्रीच गाडले गेले असते तर?
अविकसित, पथभ्रष्ट आदिमानव
अस्तित्वात होते
अशी नोंद एखाद्या शास्त्रज्ञाने केली असती !…

मग मी दार खिडक्या घट्ट लावून घेतो
आणि युद्ध पातळीवर आवराआवरीला लागतो…
टेप बंद, फॅन बंद, कॉईलचे पिंप बंद…

काल रात्री माझ्या दोन जीवलग मित्रांनी
एकमेकांची गचांडी धरली…
( मी खसखसा जमीन पुसू लागतो!)

काल एक आनंदी चेहर्‍याचा माणूस
का कुणास ठाऊक
हमसाहमशी रडू लागला…
( मी चूरगाळलेली चादर स्वच्छ अंतरतो!)

अगदी नाहीच राहवले तेव्हा
एकाने काल मला सांगितलेच-
मी तुझा हेवा करतो आणि द्वेषसुद्धा
( मी चेहर्‍याला कडक इस्त्री मारतात
तशी कपड्याला मारू लागतो!)

तिच्या सार्‍या आठवणींना केले होते ताडीपार
त्या सार्‍या काल आल्या, नग्नावस्थेत घरभर नाचल्या
मला सहन झाले नाही,
सिंडरेलाच्या बुटासारखे त्यांचे एक एक वस्त्र
पडले आहे पापण्यांत,
पण मी ते गुंतावल्यासारखे बाल्कनीच्या खाली
टाकून देईन…

सारे भराभरा करायचे रिकामे…
स्वच्छ घासायची भांडी…
स्वच्छ चेहरे... स्वच्छ डोळे…
सारे कसे स्वच्छ सुंदर
सारे कसे जागच्या जागी
सारे कसे आलबेल
सारे कसे शांत शांत…
जणू काही घडलेच नाही काही असे…
जणू काल विसरलीच रात्र घरात यायचे असे…
तिसर्‍या घंटेपूर्वी घरात आवरून,
दबा धरून बसावे असे…

…हं…आता उघडतो दारं,उघडतो खिडक्या…
थोडा वारा येऊ दे... थोडं उन्ह येऊ दे…
छान…
या…
आता तुम्हालाही आत यायला हरकत नाही!...

-संदीप खरे

Tuesday, April 20, 2010

खलनायक

एखाद्या खलनायकासारखे
कपाळावर बंदूक टेकवून
आयुष्य करून घेते आहे
शरणागतीच्या कागदांवर
सह्यांवर सह्या

…आणि
माझ्या खणात येऊन पडताहेत
कवितेच्या पानांनी भरलेल्या
वह्यांवर वह्या…

-संदीप खरे

Sunday, April 18, 2010

हसा बाई हसा

हसा बाई हसा
थोडा वेळ बसा
बसलात तरी सुद्धा पाहु नका वाट
नका पाहु वाट तरी घोडे येती सात

बसा बाई बसा
पाठीवर बसा
पाठीवर बसूनिया जावा दूर दूर
झाकायचे डोळे तरी दिसतील पूर

दिसा बाई दिसा
कोणीतरी दिसा
कोणीतरी दिसा ज्याच्या टोपीमध्ये पीस
ओठामध्ये शीळ आणि झळा काखोटीस !

शिळा बाई शिळा
वेळूभर शिळा
वेळूभर शिळा त्याची ओली ओली झिंग
शिळेवर गाणे झुले, गाण्यावर अंग!

झुला बाई झुला
वर खाली झुला
झुल्यावर गहानीत टाका प्राण पाच
रोज रोज पायाखाली फुटायाची काच

फुटा बाई फुटा
एकदाचे फुटा
एकदाचे फुटा, कळो एकदाचे खरे
कावळ्याच्या शेपटीला मोरपिशी तुरे

पिसा बाई पिसा
जीव वेडा पिसा
जीव वेडा रोज एका घोड्यावर स्वार
जाता जाता करायचे हवेमध्ये वार

करा बाई करा
काहीतरी करा
काहीतरी करा किंवा करू सुद्धा नका
बिनचुक पडे तरी छातीमध्ये ठोका

पडा बाई पडा
आता तरी पडा
ठेवा जरा जीव आणि करा लांब पाय
समजले सारे…त्यात हसायचे काय !!

-संदीप खरे

Thursday, April 15, 2010

पत्र !!

पत्र पोहोचले…धन्यवाद!
पत्रातून तू जपून पाठविलेले आपल्यातले अंतर…
…ते ही सुखरूप पोहोचले…धन्यवाद !

पत्रात मजकूर दिसला नाही;
निळ्यासावळ्या रंगात रंगवलेल्या
मोकळ्या माळरानाचे लॅंडस्केप तेवढे दिसले…
त्यातल्या उभ्या असलेल्या
एकुलत्या एक झाडावर
एकच छोटासा ढग पाऊस पाडत होता
निवळलेल्या नजरेसाठी,
मनात संथ वाजू लागलेल्या मुरलीसाठी…धन्यवाद!

आता काहीच अपेक्षा न ठेवता परत पत्र वाचेन;
भरल्या आभाळात क्षितीजाकडे सरकत चाललेली
पक्ष्यांची संथ माळ दिसते आहे…

पत्र मीच लिहिले असेन…कदाचित मलाच !
काही असो…
दुपारी खालच्या गार दगडी घरातल्या
आरामखुर्चीसारखे
शांत,निवांत वाटते आहे…
त्याबद्दल धन्यवाद…मलाच !!

-संदीप खरे

Wednesday, April 7, 2010

जन्म शोधत्याचा

मला आला वीट भारी आळसावल्या क्षणांचा
काळोखातल्या चौकोनी,षट्कोनी दुष्मनांचा

मला हवे वाटू लागले शिव्याशाप आपुल्यांचे
मला नको वाटला आशीर्वाद उपऱ्यांचा

माझी वीण उसवू दे,माझा चिरो कोणी गळा
त्याला मिळू दे उरात माझ्या, गंध केवड्याचा

आणि किनार्‍यावरती जेव्हा विरतील लाटा
कोणी घेवो माझा मोती,कोणी वसा शिंपल्याचा

ज्याला मिळणार मोती जन्म राजवर्खी त्याचा
ज्याला मिळेल शिंपला त्याचा जन्म शोधत्याचा!!

-संदीप खरे

Monday, April 5, 2010

मंतरलेले पाणी

झरझरते नभ घागर मंथर, थरथर एकटवाणी
अंथरलेली हिरवळ त्यातून मंतरलेले पाणी

नभ,डोंगर,कुरणे सारे
स्वप्नांच्या पुढचे आहे
हे खरेच आहे सारे
की लहर धुक्याची आहे?
सत्य असो वा भास यातुनी नये जागवू कोणी

मी पात्या पात्यावरती
पृथ्वीला वाचत आहे
आत्म्याचे शोधत गाणे
अनिवार भटकतो आहे
आज जळाहून उघडा मी अन् वार्‍यापरी अनवाणी

मी उगाच समजत होतो
हा ऋतू जाणता झाला
संध्येत मिसळता पाणी
बघ रंग कोणता झाला
पैल निघावे वाटे, ठेवून ऐल तटावर देणी

-संदीप खरे