Sunday, January 30, 2011

हुतूतू...

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

जीव जडता देतसे जो जिवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन सारखे आरोपही
झेलतो अन पेलतो जो दीपकाचे तेजही
अन दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मानगर्वापार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्षही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेटतो
तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

ताठ मानेने मनाशी जो स्वत:च्या बोलतो !
वाटले ते सांगते अन सांगतो ते वागतो !!
हासताना हसतो अन क्रंदताना क्रंदतो...
जो सजीवतेचे ठसे साऱ्या क्षणांवर ठेवतो...
उत्कटाच्या उन्ह छायेतून घर बांधायचे

शोधते निष्पापता लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्या मनातून चंद्र घेऊन जातसे
एकल्या जखमांसवे जो ओळखीचे बोलतो
वाटते तो बोलताना मीच आहे बोलतो
ज्यामुळे हे जगत जाणे सार्थकी वाटायचे

तीर्थ नेत्री दाटताना स्पर्श अस्पर्शापुढे
हात हातातून येत हर शीतळ व्हायचे
जन्ममृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या छायेतून घर बांधायचे
हुतूतू...

अमेरिकेहून ई-पत्र येते तुझे...
उजळत चाललेली असते तुझी पश्चिम
पण तरीही खूप 'मिस' करत असतोस तू
तुझे आई-बाबा, मित्र, इथले रस्ते, इथले कट्टे
अगदी खड्डे, प्रदूषण आणि धुळसुद्धा...

कपाळाला माती लावून
मांडीवर शड्डू ठोकून, रेघ ओलांडून पलीकडच्या पार्टीत गेलास
तेव्हाच चुकचुकलं होतं खरं तर काही मनात
आता ई-पत्र येते अजुनही नियमित तुझे
पण जाणवते की शब्दांचे पाय
घट्ट पकडून ठेवले आहेत कोणीतरी
आणि संपत चालला आहे दमसास...

वाटते की मायन्यापासून शेवटच्या 'टेक केअर' पर्यंत
आता मजकूर लिहीतच नाहीस तू
वाक्य नव्हेत, आठवणी नव्हेत, आश्वासने नव्हेत
पत्रभर एकच शब्द वाचतो मी आजकाल
हु तू तू तू तू तू तू...

-संदीप खरे

Wednesday, January 19, 2011

जरी

मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव 'रोख' ठोक बनतो
जे ना माझे ते स्वप्नांशी उधार मागवतो !

कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी
पाऊस बघता ऊन्ह; उन्हातुन पाऊस आठवतो !

बंद पापणी बघून गेली स्वप्ने माघारी
तेव्हापासून डोळे उघडे ठेवुनिया निजतो !

कुणि भेटा रे खरेच होऊन वाळवंट सत्त्वे
रोज कितीदा मेघ मनातून माझ्या गडगडतो

आयुष्याच्या पायाशी जरि नम्रपणे बसतो
उलटून त्याचे पाय एकदा पाडावे म्हणतो !

-संदीप खरे

Tuesday, January 18, 2011

कल्पना...

या जगण्याच्या जंजाळातुन
कधी कल्पना जाते स्पर्शुन,
कि हा चंद्रम येत बहरून
झोपेच्या दुलईतून ओढून
हट्ट मांडते ती नाजुकसा,
आणि क्षणांचा फुटे आरसा !
त्या बेभानी विलयानंतर
शमवित श्वासांमधली थरथर
रातराणीच्या आवेगातुन
चंद्रखुणांच्या सांद्र स्वरांतुन
हळू आणते ती धरणीवर
उन्मादाचा निपटत गहिवर !
घरातुनी अंगणात ओढून
हळूच नेते मजला खेचुन
समोर माझ्या बैठक मारून
गुडघ्यावरती माझ्या रेलुन
जरा कपाळी आठी घालून
जरा लाजरे हासुन हासुन
हात कापरे हाती घेऊन
शब्द जरा लाडिकसे लेऊन

मला विनवते - '' म्हण ना काही !
कवितेविण गत्यंतर नाही !
मी लाटेसम फुटले होते
अन ताऱ्यासम तुटले होते
मी पुनवेचे उधाण झाले
लुटवून सारे विराण झाले !
भर ना सखया ओंजळ माझी
सावर सखया भोवळ माझी
हलक्या हाते हळव्या वळी
चितार ना कवितेची नक्षी !!''

'' नको हट्ट हा, सखे थांब तू
शब्दांना ठेवून लांब तू
धाप गोड ही उरी असू दे
स्वप्नांहूनही खरी असू दे
असा तुझ्या असण्याचा दर्वळ
शब्दांना अर्थांची भोवळ !
नकोस मागू आता काही
देणाऱ्याला भानच नाही !
देणाराही...घेणाराही
अंतर आता उरले नाही !
उद्या सकाळी प्रकाश येईल
सारे हळवे घेऊन जाईल
दवासारखे उत्कट सारे
उद्या व्हायचे उन्हबावरे !
नकोच म्हणुनि काही मागू
पद्यातून गद्यासम वागू !

हट्ट नको आता शब्दांचा
क्षण हा मौनाच्या ओठांचा !
क्षण असला भाग्याने मिळतो
आयुष्याच्या सोबत जळतो
दिवा लागता या हृदयांशी
नको उधारी कवितेपाशी !
असेच मजला मूक राहू दे
जरी चूक हे; चूक राहू दे
पहाट राहो अशीच ही की
कवितेच्या बाहूत कवी मी !!
( अस्वस्थाचे अंतर्नाद उत्कटाच्या उन्हवेळा...)

-संदीप खरे