Sunday, October 31, 2010

ही कागदाची होडी

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली ना
ती याच अपेक्षेने
की असंही होऊ शकेल
की झ-यातून नदीपर्यंत,
नदीतून खाडीपर्यंत
आणि खाडीतून समुद्रापर्यंतही जाऊ शकेल ही होडी !
कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद
समुद्राशी पोहोचेपर्यंत
आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटांनाही
लळा लावून तरंगत राहील ही...
कडाडतील वीजा...लाटांचे डोंगर होतील
ख-याखु-या जहाजांची शिडं फ़ाटून जातील
पण तरीही या चिमुकलीचं गोडुलं अस्तित्व
प्रलयावर तरंगणार्‍या पिंपळपानासारखं डुलत राहील!
भाबडीच आहे ही आशा
पण शेकडो वर्षाच्या वडापिंपळाच्या
जमिनीखाली वसाहत केलेल्या मुळांसारखी
सजीव आणी लासट...

होडी कागदाचीच आहे...
पण त्यावर लिहिली आहे
सारा जन्म पणाला लावून रसरसलेली
एक कविता....

म्हणून तर
ही कागदाची होडी
या झ-यात सोडून दिली ना
ती...याच...तयारीने.....की....

-संदीप खरे

Saturday, October 30, 2010

वेडी वेळ...

हसायचीस तुझ्या वस्त्रासारखीच फिकी फिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शाहण्यासारखेच चालले होते तुझे सारे
वेड्यासारखा बोलू जायचा माझा चेहरा

संवादांचे लावत लावत हजार अर्थ
किती घातला माझ्यापाशी मीच वाद
'नको' म्हणून गेलीस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला द्यावी दाद !

सहजतेच्या धूसर, तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन !
शब्दच नव्हे, मौन ही असते हजार अर्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून !!

-संदीप खरे

Thursday, October 28, 2010

लेक...

हात वर करत, टाचा उंचावत
अपार उत्सुक डोळ्यांनी बघायचीस...

मी ओणवा होत बोलायचो
बोबड्या गोष्टी सांगायचो...

अवघडलेल्या पाठीसाठी
सारं जग, सारं जगणं
तीन फूट झालेलं...

...आणि आता
भिवईएवढी उंच होऊन
बोलू लागल्येयस
तर पाठीला
कायमचं पोक आलेलं...

-संदीप खरे

Wednesday, October 20, 2010

घर-३

एक घर बांधले जात आहे
त्यात कोण राहील?...कसे?...
हा भाग वेगळा
पण एक घर बांधले जात आहे...

घराभोवती खूप निळसर डोंगर आहेत
त्यावरून एक पायवाट येते,
त्यावरून न येणार्‍या तुला
सांगून ठेवलेलं बरं...
एक घर बांधले जात आहे...

घराला झक्कास दारं खिडक्या
वारं भरपूर...पाणी थंडगार...
प्रशस्त...मोकळं...हवेशीर...वगैरे...
हा झाला मातीविटांच्या बांधकामाचा तपशिल!...
...एक घर बांधलं जात आहे...

मी इथे नेहमीच चक्कर मारतो
आणि वळचनीच्या घरट्यातले
कबुतरांचे संसार आनंदाने पाहतो...
एक घर बांधले जात आहे
आणि तिथे मी सकाळ दुपार रेंगाळतो;
पण संध्याकाळ हिंदकळायला लागली
की सासुरवाशीणीसारखा पळ काढतो...
डोंगर दिसेनाहीसे होतात...
भिंती अगदीच भिंती वाटू लागतात...
आणि आशा तर रातांधळीच असते!
मग थांबायाचे कशाला?.......

...जाताना गाडी थांबवतो
आणि एका पायावर रेलात
मागे वळून म्हणतो,
'हं! एक घर बांधले जात आहे...
त्यात कोण राहील...कसे...'

गाडीला दिवा नसतोच
आणि रस्ताही असमंजस...!!
गावापासून खूप दूर
एक घर बांधले जात आहे...
त्यात कोण राहील...कसे......

-संदीप खरे

Sunday, October 3, 2010

घर-२

या घराने काय केले?
फक्त डोईभर कर्ज केले!...

याने हाडे चघळली आमची...
घाम प्याले,रक्त प्याले...
आणि सारे तारुण्य
चाटून पुसून साफ केले...
या घराने काय केले?

इथे दिवस कधी निश्चिंत मनाने स्थिरावला नाही
आणि रात्र कधी गाढ झोपली नाही
आमच्या दुर्दैवाशी संगनमत साधून
जगण्याची खूप अफरातफर केली या घराने...
रोज नवेनवे ताण देत
उंदीर मांजराचा खेळ खेळत राहिले...
या घराने काय केले?...

या घरचे वास्‍तुशांतीचे विधी चुकले नाहीत,
खड्डे पुरायचा कोपरा चुकला नाही
फक्त वेळ चुकली!
घर जुने झाले तरी कर्ज कधी उतरलेच नाही...
पोट फुगवुन फुटलेल्या बेडकीची गोष्ट आम्ही ऐकली
पण आम्हाला ती उमगली नाही...
वस्तुस्थितीने थेट घावच घातले
आधी इशारा दिलाच नाही...
डोळे उघडले आणि कळलं
आमचं स्वप्न आम्हाला पेललंच नाही...
हे घर...
याने आमचे त्राण नेले...
आतून आतून भित्रे केले...
या घराने काय केले?...

इथे रात्रीबेरात्री भांडून किंचाळून उठले आवाज
आणि दुपार हुंदके ऐकत मुसमुसत राहिली...
इथे डहाळी कधी फुलली नाही...नुसतीच तगली!
इथे माणसं मोठी नाही, थेट म्हातारीच झाली!
रडत,धडपडत,ठेचकाळत,
रक्त येईस्तोवर करकचून ओठ दाबत
याने फरफटत ठेवले...
कुठल्या घराविषयी आम्ही बोलत होतो
कुणास ठाऊक;
या घराने तर आम्हाला बेघर केले...

या घराने काय केले...
या घराने काय केले...

-संदीप खरे

Saturday, October 2, 2010

घर-१

रात्री घरातल्या चावीने हलकेच उघडेन कुलुप...
मग दिसेल...घर नावाचे बंद कुलुप!

हे कुलुप तेव्हाच उघडते
जेव्हा जेव्हा घडते त्याच्या मनासारखे
जेव्हा जेव्हा वर्तुळांच्या त्रिज्या
हुकुम मानतात परिघांचे...

इथे जुळवायचा नाही शब्द बाराखड्यांच्या बाहेरचा
इथे उतून मातून टाकायचा नाही वसा व्रतस्थ चाकोरयांचा
इथे प्रेम लागते इमानदार...पंख छाटल्या पोपटासारखे
इथे रक्त लागते उदासीन...जन्मजात बहिर्‍यासारखे
इथे मनांना नाही परवानगी काही नवे स्वत:त घेण्याची
इथे विचारांना नकोय शक्यता...माहीत असलेल्यापल्याड काही असण्याची!
इथे मल्हार गायचा पाऊस पडेल तेव्हाच
इथे मारवा गायचा दिवस ढळेल तेव्हाच
इथे अवेळीचे उफराटे हिशोब कळू शकत नाहीत
इथे क्षणांचे सैनिक आज्ञेविना हलू शकत नाहीत

घराला आहे अभिमानाने सांगावेसे गोत्र
घर आहे अगदी घर हवा तसा पवित्र
कर्मठतेची खडूस आळी भाळावरती दिसते
प्रामाणिकतेपेक्षा इथे अदब मोठी असते
असे घर सोयीसाठीच विरोध करत नसते

उघड बोलत नाही, पण मनात कुजकट हसते
'चुक' 'बरोबर'...दोनच शब्दांत बसवायचे मागणे
कडोसरींच्या किल्ल्यांगत टांगून द्यायचे जगणे
अगदीच जेव्हा साखरसुद्धा लागणार नाही गोड
क्षमेपेक्षा घर करेल थोडीशी तडजोड

आता एक तडजोड दिसेल...
जिच्या पांघरूणात जन्म होऊन जाईल गुडूप...!!
रात्री खिशातल्या चावीने हलकेच उघडेन कुलुप...
मग दिसेल...घर नावाचे बंद कुलुप!

-संदीप खरे