Sunday, October 3, 2010

घर-२

या घराने काय केले?
फक्त डोईभर कर्ज केले!...

याने हाडे चघळली आमची...
घाम प्याले,रक्त प्याले...
आणि सारे तारुण्य
चाटून पुसून साफ केले...
या घराने काय केले?

इथे दिवस कधी निश्चिंत मनाने स्थिरावला नाही
आणि रात्र कधी गाढ झोपली नाही
आमच्या दुर्दैवाशी संगनमत साधून
जगण्याची खूप अफरातफर केली या घराने...
रोज नवेनवे ताण देत
उंदीर मांजराचा खेळ खेळत राहिले...
या घराने काय केले?...

या घरचे वास्‍तुशांतीचे विधी चुकले नाहीत,
खड्डे पुरायचा कोपरा चुकला नाही
फक्त वेळ चुकली!
घर जुने झाले तरी कर्ज कधी उतरलेच नाही...
पोट फुगवुन फुटलेल्या बेडकीची गोष्ट आम्ही ऐकली
पण आम्हाला ती उमगली नाही...
वस्तुस्थितीने थेट घावच घातले
आधी इशारा दिलाच नाही...
डोळे उघडले आणि कळलं
आमचं स्वप्न आम्हाला पेललंच नाही...
हे घर...
याने आमचे त्राण नेले...
आतून आतून भित्रे केले...
या घराने काय केले?...

इथे रात्रीबेरात्री भांडून किंचाळून उठले आवाज
आणि दुपार हुंदके ऐकत मुसमुसत राहिली...
इथे डहाळी कधी फुलली नाही...नुसतीच तगली!
इथे माणसं मोठी नाही, थेट म्हातारीच झाली!
रडत,धडपडत,ठेचकाळत,
रक्त येईस्तोवर करकचून ओठ दाबत
याने फरफटत ठेवले...
कुठल्या घराविषयी आम्ही बोलत होतो
कुणास ठाऊक;
या घराने तर आम्हाला बेघर केले...

या घराने काय केले...
या घराने काय केले...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment