Wednesday, June 29, 2011

ब्लॅंक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

-संदीप खरे

Tuesday, June 28, 2011

प्रलय

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?

मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

-संदीप खरे

Sunday, June 26, 2011

जा जा जा दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना...देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना...
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन...असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा...पडे त्याच्या हाती दिवा...पडे त्याच्या हाती दिवा...
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही...वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी...मला एक मन भारी...मला एक मन भारी...
तुला दोन्ही जड नाही...
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही...काही…दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

-संदीप खरे

Saturday, June 25, 2011

झोप

झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

बायको...मुलगी...नातवंडं...पतवंडं...
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून...माजघरातून...
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून...
मिटक्या मारतायत...!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर...
करंडीत रचून ठेवलेल्या स्तब्ध सफरचंदांसारखे
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

कुशीवर...पाठीवर...पोटावर...
उतरत्या झोपेसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा तळ...!
भरून निघतायत ओल्या सुक्या जखमा, शरीरांच्या झिजा...
तयार होतायत पोटात आपसुकपणे आयुष्याचे रस...अन्न पचतंय...
बाळ मोठी होतायत...केस पिकतायत...हळू...हळू...
रेल्वेच्या एअरकंडीशन्ड डब्यात बसल्यासारखा
किती शांतपणे पार पडतो आहे
अंतापर्यंतच्या प्रवासातला हा निद्रेचा टप्पा...

रोजच्या रोज अनेक अंगांनी छळून छळून घेताना
'टाईम प्लीज' म्हणत स्वत:लाच सूत दिल्यासारखे...
'जगण्याचा आळ नको अन् मेल्याचे दु:ख नको' म्हणत म्हणत
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

-संदीप खरे

Sunday, June 19, 2011

तथास्तू !

सारे करून थकल्यावरती रेंगाळशीलच टाकत श्वास
मागे बघत पाऊलखुणा शोधात राहशील सत्याभास
'इतके चालत आलो आपण? 'म्हणशील चोळत आपले पाय
'वाटेमधले इतके पक्षी, झाडे...त्यांचे झाले काय ?'
त्यांच्यासाठी इतकाच रस्ता, इतकेच अंतर असते जाणे
आपण आपले मानत अस्सल नंतर होतो केविलवाणे !
अंगांगाचा दाहक टाहो, डोळे थिजून होतील थंडी
डोक्यावरती सूर्यास्ताची उजळत असेल झुंबरहंडी
पाखरे उगाच चुकली माकली घरटी शोधात असतील हिंडत
तळे- ते ही गदगदलेले...पायांवरती लाटा सांडत
आणखीन होशील उदास उदास, मनात खोल मावळशील
दगड, डोंगर, झाडे, वाटा....ह्यांच्याइतका साकळशील
तेव्हा दुरून बघणारा मी, हलके हलके देईन हात
रक्तामध्ये फुंकिन वारा...शरिरातील सरकाविन वात
मागता मागता थकून जेव्हा म्हणशील - 'आता नकोच घेणे !'
तेव्हा गुपचूप देऊन टाकेन 'तथास्तू' चे अंतिम देणे !!

-संदीप खरे

Monday, June 13, 2011

वेळ वाईट लागली...

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली

ऊन्ह आले मावळू आणिक या दुनियेपरी
-माझियापासून पळते लांब माझी सावली

एवढी वाटे हवीशी ऊब अज्ञानातली
शक्यतांची शक्यताही मग नकोशी वाटली !

कोण हे म्हणते कधि जमली न मज सौदागिरी
अक्षरांतुन वेदना विक्रीस आहे काढली !

दूषणे कोणास द्यावी अन् कशासाठी इथे ?
माणसे होती भली रे...वेळ वाईट लागली !!

-संदीप खरे

Sunday, June 5, 2011

बोलाया काही ना उरले...

खरे तुला सांगू का राणी ? बोलाया काही ना उरले
कलेवरातून शब्दांच्या या प्राणासम हे अर्थ उडाले || धृ ||

क्षणाक्षणाच्या हिंदोळ्यावर
परस्परांचे परिचय घडले
दर्पणात डोकावू जाता
परस्परांचे चेहरे दिसले !
अतिपरिचय हा झाला बहुधा, अन् पाऱ्याचे रंग पुसले || १ ||

होती म्हणु या भेट प्राक्तनी
होते संचित जितुके तोवर...
प्रश्न अता उरलाच कुठे हा
कोण चूक वा कोण बरोबर !
तुजला खात्री कोणाचेही कोणावाचुन कधी न अडले || २ ||

विरंगुळ्यास्तव दु:ख हवे तुज
उत्कटतेची कृत्रिम लाली !
तुझ्या सुशोभित जगण्यासाठी
फुले कागदी चिकार झाली !
सत्य नको स्पर्शाया जाऊ; ते तव कक्षेच्या पलिकडले ! || ३ ||

-संदीप खरे