Sunday, June 5, 2011

बोलाया काही ना उरले...

खरे तुला सांगू का राणी ? बोलाया काही ना उरले
कलेवरातून शब्दांच्या या प्राणासम हे अर्थ उडाले || धृ ||

क्षणाक्षणाच्या हिंदोळ्यावर
परस्परांचे परिचय घडले
दर्पणात डोकावू जाता
परस्परांचे चेहरे दिसले !
अतिपरिचय हा झाला बहुधा, अन् पाऱ्याचे रंग पुसले || १ ||

होती म्हणु या भेट प्राक्तनी
होते संचित जितुके तोवर...
प्रश्न अता उरलाच कुठे हा
कोण चूक वा कोण बरोबर !
तुजला खात्री कोणाचेही कोणावाचुन कधी न अडले || २ ||

विरंगुळ्यास्तव दु:ख हवे तुज
उत्कटतेची कृत्रिम लाली !
तुझ्या सुशोभित जगण्यासाठी
फुले कागदी चिकार झाली !
सत्य नको स्पर्शाया जाऊ; ते तव कक्षेच्या पलिकडले ! || ३ ||

-संदीप खरे

No comments:

Post a Comment