Tuesday, June 28, 2011

प्रलय

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?

मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

-संदीप खरे

7 comments:

  1. धन्यवाद, मी ही कविता शोधत होतो.

    ReplyDelete
  2. खूपच छान 💐 🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌 -ही कविता "चला हवा येऊद्या " मध्ये पहिल्यांदा ऐकली.

    ReplyDelete
  4. Salute Sandip Khare for living life poetry

    ReplyDelete