Tuesday, October 11, 2011

दोघे नकळते

...ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-संदीप खरे

Wednesday, October 5, 2011

धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......

जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

- संदीप खरे

Saturday, October 1, 2011

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

-संदीप खरे