Sunday, December 23, 2012

पाऊस

गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे.....
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...

सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...

-संदीप खरे

Wednesday, December 19, 2012

पौगंड

मग मी त्यादिवशी भलताSSच विचार केला
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...

पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !

पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....

आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्पोर्या डोळ्यांची मुलगी'...
म्हटलं हं 'आवडते एवढंच...बाकी काही नाही...'

'जगाचे काय ?' असेही वाटले...
'माझे काय?' हे त्याहून जास्त !
आरशातून तरंगायचे देहभर डोळे...
वादळी...प्रसन्न...क्षणार्धात सुस्त...

दरीत संध्याकाळ मावळताना
ऐकली होती दरीभर सांडलेली सनई
वाटले होते- 'हेच जगणे !.....
झालो मोठे....थोरसुद्धा होऊ.....'
खूप वर्ष झाली आता...अजून सनईसुद्धा आवडते;
पण उसळत नाही आतून काहीच...
वाटते- नुसतेच बसून राहू....

पण भलताच विचार केला होता एकदा...
माझ्यामते तर जगावेगळा...
'हे भलतेच' असे म्हणालीही होती आई...

आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही.......

-संदीप खरे

Sunday, December 2, 2012

मित्र

मित्र म्हणायचा - "त्या पेनानेच लिही फक्त
जे झिडकारून, भीक म्हणून टाकेल अंगावर कोणी !
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी..."

मित्र म्हणायचा - "अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दु:ख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण- छे ! मी लिहिलेच नाही !!"

मित्र म्हणायचा - "प्रेमात पड पौर्णिमेला
अमावस्येशी टिकले तर चमत्कार म्हण !
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा 'नमस्कार' म्हण !"

मित्र म्हणायचा - "सुंदर काय, कुरूप काय दोन्ही त्वचांखाली
वाहत असते तेच लाल, शिळे, नियमित रक्त
सेक्सी-बिक्सी म्हणतोस ज्याला, ते ही असते पार्थाSS
देवाघरचे एक सुंदर पॅकेजिंग फक्त !"

"इस्त्री करून अंगावरती कपडे ल्यावेत कडक
याहून नसते जगात काही दुसरे हसण्यासारखे !
भीक मागते पोर...त्याचे काळभोर डोळे
जगात नसते याहून काही दुसरे दुखण्यासारखे !!"

"पाऊस असतो स्वप्न केवळ, माती असते स्वभाव
खड्डे असतात रस्त्यांवरचे पाऊसकालीन अभाव !
इच्छा असतात रंगांसारख्या, सरड्यासारखे मन
जगणे असते निर्बुद्धाची कुंपणापाशी धाव !!"

मित्र म्हणायचा- "सांग एक मित्र होता कधी
पृथ्वीला डायनॉसॉरची स्वप्ने पडण्याआधी !
अमिबाच्या पेशीसारखा एकटा, सहज तरी
फाटत फाटत अनेक व्हायची भाळी होती व्याधी !!"

-संदीप खरे