Tuesday, February 22, 2011

काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार
मग आकाश काळंनिळं होणार
मग मातीला गंध फुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार...
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार...
मग मी ती लपवणार...
मग लपवूनही ती कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील तर रडणार...
नातेवाईक असतील तर चिडणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि या सगळ्याशी तुला काहीच
घेणं-देणं नसणार...काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार...
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार...
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार...
मग साहिरनी लिहिलेलं असणार...
मग ते लतानी गायलेलं असणार...
मग तू ही नेमकं आत्ता हेच गाणं
ऐकत असशील का असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदिल लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार...
मग खिडकीत घट्ट बांधुन ठेवलेल्या
आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग ५ फूट ५ इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग उरी फुटुन जावंसं वाटणार
छाताडातून हृदय काढुन
त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार...
मग सारंच कसं मूर्खासारखं
उत्कटं उत्कटं होत जाणार
पण तरीही श्वासांची लय
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण बंद नाही पडणार !...
काय रे देवा...

पाउस पडणार
मग हवा हिरवी होणार...
मग पानापानांत हिरवा दाटणार...
मग आपल्या मनाचं पिवळं पान
देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार...
पण त्याला ते नाही जमणार...
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार...
मग ते ओशाळणार...
मग पुन्हा शरीराशी परत येणार...
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार
एसडीचं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार...
मग माझ्या जागी मी असणार...तिच्या जागी ती असणार...
कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने
पोटात निपचित झालेलं असणार.....

पाऊस गेल्या वर्षीही पडला...
पाऊस यंदाही पडतो...
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...

-संदीप खरे

Sunday, February 20, 2011

वंदन

मज येते सारे एकच मी का सांगू ?
आभाळजिण्याला एकच ढग का मागू ?
ही नक्षत्रे अन तारे पूर्वज माझे
का कवडीकवडीसाठी क्षुल्लक वागू ?

जे जगण्यासाठी करती लाख बहाणे
घालीन तयांना अगदी सुलभ उखाणे
पडलेच कधी ना असल्या प्रश्नांवरती
हसतील तयांचे दिसतील दात दिवाणे !

मी श्वास मोजतो येत्या लाटांवरती
उच्छ्वास म्हणजे मृत समुद्र भरती !
नशिबाच्या लपल्या खडकावरती येथे
फुटतात गलबते स्वप्न कुणी ज्या म्हणती !

मी आर न येथे पार न ऐसा आहे !
जो नको कुणाला असा भरंवसा आहे !
माझ्याविन कुठला डाव कधी न अडला
पडला न कधी मी ऐसा फासा आहे !

मी माझ्यासाठी तणाव खासा आहे !
मी दुसऱ्यांसाठी बनाव खासा आहे !
ना फक्त जगाला, स्वत:सही जो छळतो
मी असला हट्टी स्वभाव खासा आहे !!

या दारी येते रोज चांदणी एक
ती गतजन्मांच्या पुण्याईची लेक !
या भेटीसाठी केवळ तुटक्या फुटक्या
मी घरात माझ्या रोज घालतो खेप !

जळते दुसऱ्यास्तव ते तर चंदन आहे
रडणे आपुल्यास्तव वृथाच क्रंदन आहे
कळलेच कधी ना कोणासाठी जगला
त्या माझ्या जन्मा माझे वंदन आहे !!

-संदीप खरे

Thursday, February 17, 2011

हसलो म्हणजे

‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही !…

‘हसलो’ म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
‘हसलो’ कारण शक्यच नव्हते दुसरे काही
‘डोळ्यामध्ये पाणी नव्हते’ ऐसे नाही !

‘हसलो’ कारण तूच कधि होतिस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
‘हसलो’ कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

‘हसलो’ कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
‘हसलो’ कारण तुलासुद्धा ते खरे वाटते !!
‘हसलो’ म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
‘आतुन आलो होतो डवरून’ ऐसे नाही...

‘हसलो’ कारण विज्ञानाची ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
‘हसलो’ कारण हिशेबास मी दमलो नाही
‘हसलो’ कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

‘हसलो’ कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
‘हसलो’ कारण सत्याची मज भीती नाही
‘हसलो’ कारण फसण्याचा धसका नाही...

-संदीप खरे

Tuesday, February 15, 2011

कसे वाटते...

कसे वाटते सांग मला छळताना ?
मला जाळुनी पुन्हा स्वत: जळताना !

मजा वाटते आणि रागही येतो
शर्यत संपून गेल्यावर पळताना !

तुला पुरावे मिळतील मी असण्याचे
मी नसताना अश्रू ओघळताना !

तुझियावरती पाऊस कोसळताना
आज पाहिले पाणी विरघळताना

एकही नव्हता सोबत गर्दीमधला
वळणापाशी शेवटच्या वळताना !

उल्लू नव्हतो ! स्वत:स रमवत होतो
आस्तिक होऊन मस्तक आदळताना !

नव्या नव्या मज ओव्या सुचती रोज
जुनेच जगणे पुन्हा पुन्हा दळताना !

बघत राहिले जग पेल्यातुन माझ्या
वाफ मामुली विराट वादळताना !

-संदीप खरे

Wednesday, February 9, 2011

नकोस भांडू जगासवे

नकोस भांडू जगासवे अन् नको उगा हट्टाला पेटू
वृधत्त्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू !!

फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा ! कर्तव्यांचा !
सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जिण्यांचा !
आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू !

बऱ्याच शिल्लक गप्पा, हसणे आणिक रडणे रुसणे देखिल !
स्थळकाळाचे भान पुसोनी केवळ सोबत असणेदेखिल !
सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू !!

अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख ?
देहच रुचतो आणिक सुचतो ! देहच अस्तित्वाची ओळख !
कसली भीती विरता यौवन ? भरता घागर ? सरता हेतू !...

नको भेट ही आत्ता तरिही, नको पुढिल जन्माचे बोलू
कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन् केव्हा भेटू ?
जन्म सांगतो, एका जन्मी जळून घे अन् विझून घे तू !

-संदीप खरे

Thursday, February 3, 2011

काय करते ती खुणा

काय करते ती खुणा अन् काय माझ्या कल्पना
काय बोले सत्य आणि काय माझ्या वल्गना !

एकदा ती हासली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभराची नोंद केवळ; युगभराची वंचना !

एवढेही तू नको घेऊ मनावर शब्द हे !
'जा' तुला म्हटलो खरा मी, पण जराशी थांब ना !

त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना !

क्रूर हे रस्ते तुझे पण मी ही इतका निश्चयी
टोचत्या काट्यांतस माझे पाय देती सांत्वना !

गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना !

ऐलदेशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना !!

-संदीप खरे