Thursday, February 3, 2011

काय करते ती खुणा

काय करते ती खुणा अन् काय माझ्या कल्पना
काय बोले सत्य आणि काय माझ्या वल्गना !

एकदा ती हासली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभराची नोंद केवळ; युगभराची वंचना !

एवढेही तू नको घेऊ मनावर शब्द हे !
'जा' तुला म्हटलो खरा मी, पण जराशी थांब ना !

त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना !

क्रूर हे रस्ते तुझे पण मी ही इतका निश्चयी
टोचत्या काट्यांतस माझे पाय देती सांत्वना !

गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना !

ऐलदेशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment