Sunday, January 30, 2011

हुतूतू...

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

जीव जडता देतसे जो जिवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन सारखे आरोपही
झेलतो अन पेलतो जो दीपकाचे तेजही
अन दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मानगर्वापार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्षही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेटतो
तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

ताठ मानेने मनाशी जो स्वत:च्या बोलतो !
वाटले ते सांगते अन सांगतो ते वागतो !!
हासताना हसतो अन क्रंदताना क्रंदतो...
जो सजीवतेचे ठसे साऱ्या क्षणांवर ठेवतो...
उत्कटाच्या उन्ह छायेतून घर बांधायचे

शोधते निष्पापता लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्या मनातून चंद्र घेऊन जातसे
एकल्या जखमांसवे जो ओळखीचे बोलतो
वाटते तो बोलताना मीच आहे बोलतो
ज्यामुळे हे जगत जाणे सार्थकी वाटायचे

तीर्थ नेत्री दाटताना स्पर्श अस्पर्शापुढे
हात हातातून येत हर शीतळ व्हायचे
जन्ममृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या छायेतून घर बांधायचे
हुतूतू...

अमेरिकेहून ई-पत्र येते तुझे...
उजळत चाललेली असते तुझी पश्चिम
पण तरीही खूप 'मिस' करत असतोस तू
तुझे आई-बाबा, मित्र, इथले रस्ते, इथले कट्टे
अगदी खड्डे, प्रदूषण आणि धुळसुद्धा...

कपाळाला माती लावून
मांडीवर शड्डू ठोकून, रेघ ओलांडून पलीकडच्या पार्टीत गेलास
तेव्हाच चुकचुकलं होतं खरं तर काही मनात
आता ई-पत्र येते अजुनही नियमित तुझे
पण जाणवते की शब्दांचे पाय
घट्ट पकडून ठेवले आहेत कोणीतरी
आणि संपत चालला आहे दमसास...

वाटते की मायन्यापासून शेवटच्या 'टेक केअर' पर्यंत
आता मजकूर लिहीतच नाहीस तू
वाक्य नव्हेत, आठवणी नव्हेत, आश्वासने नव्हेत
पत्रभर एकच शब्द वाचतो मी आजकाल
हु तू तू तू तू तू तू...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment