या जगण्याच्या जंजाळातुन
कधी कल्पना जाते स्पर्शुन,
कि हा चंद्रम येत बहरून
झोपेच्या दुलईतून ओढून
हट्ट मांडते ती नाजुकसा,
आणि क्षणांचा फुटे आरसा !
त्या बेभानी विलयानंतर
शमवित श्वासांमधली थरथर
रातराणीच्या आवेगातुन
चंद्रखुणांच्या सांद्र स्वरांतुन
हळू आणते ती धरणीवर
उन्मादाचा निपटत गहिवर !
घरातुनी अंगणात ओढून
हळूच नेते मजला खेचुन
समोर माझ्या बैठक मारून
गुडघ्यावरती माझ्या रेलुन
जरा कपाळी आठी घालून
जरा लाजरे हासुन हासुन
हात कापरे हाती घेऊन
शब्द जरा लाडिकसे लेऊन
मला विनवते - '' म्हण ना काही !
कवितेविण गत्यंतर नाही !
मी लाटेसम फुटले होते
अन ताऱ्यासम तुटले होते
मी पुनवेचे उधाण झाले
लुटवून सारे विराण झाले !
भर ना सखया ओंजळ माझी
सावर सखया भोवळ माझी
हलक्या हाते हळव्या वळी
चितार ना कवितेची नक्षी !!''
'' नको हट्ट हा, सखे थांब तू
शब्दांना ठेवून लांब तू
धाप गोड ही उरी असू दे
स्वप्नांहूनही खरी असू दे
असा तुझ्या असण्याचा दर्वळ
शब्दांना अर्थांची भोवळ !
नकोस मागू आता काही
देणाऱ्याला भानच नाही !
देणाराही...घेणाराही
अंतर आता उरले नाही !
उद्या सकाळी प्रकाश येईल
सारे हळवे घेऊन जाईल
दवासारखे उत्कट सारे
उद्या व्हायचे उन्हबावरे !
नकोच म्हणुनि काही मागू
पद्यातून गद्यासम वागू !
हट्ट नको आता शब्दांचा
क्षण हा मौनाच्या ओठांचा !
क्षण असला भाग्याने मिळतो
आयुष्याच्या सोबत जळतो
दिवा लागता या हृदयांशी
नको उधारी कवितेपाशी !
असेच मजला मूक राहू दे
जरी चूक हे; चूक राहू दे
पहाट राहो अशीच ही की
कवितेच्या बाहूत कवी मी !!
( अस्वस्थाचे अंतर्नाद उत्कटाच्या उन्हवेळा...)
-संदीप खरे
No comments:
Post a Comment