Tuesday, December 21, 2010

प्रेम...

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यांमधले रक्त
ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात
चाकोरीला उध्वस्ताचे घण हवे असतात...

तसे काही चेहर्‍यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते !
ओठांत नाही हवी असते डोळ्यांत एक कथा
हवी असते षड्जासारखी सलग, शांत व्यथा...

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
वरुन खाली कोसळणारी मिंड हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती
प्रेम नाही, हवी असते मला चौथी मिती !...

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चाताप !....

-संदीप खरे

No comments:

Post a Comment