Sunday, November 28, 2010

सये आता सांग...

येण्याआधी वाट | आल्यावर सर |
आणि गेल्यावर | रिक्त मेघ |

इतके लाडके | असु नये कोणी |
डोळ्यांतून पाणी | येते मग ||

रातराणी बोल | 'परत कधी' चे |
उत्तर मिठीचे | संपू नये ||

सये आता सांग | सांग तुझे घर |
आहे वाटेवर | माझ्याच ना ||

-संदीप खरे

Tuesday, November 23, 2010

पावसाला पापण्यांशी...

पावसाला पापण्यांशी थोपवावे लागते
सर्व आहे ठीक ऐसे दाखावावे लागते

रोज माझी पाहतो मी प्राक्तने लाटांपरी
गाठण्याआधी किनारा ओसरावे लागते

हाय ! प्रेमातून सांगू काय व्हावे लागते ?
तीर व्हावे लागते अन् लक्ष्य व्हावे लागते!

अक्षरे ना ! शब्द नाही !समजते सारे तरी
पत्र ओल्या पापण्यांनी पाठवावे लागते

गौरकाया राधिकेला 'कृष्ण' व्हावे लागते
होत माती पावसाला साठवावे लागते

भेटही घेईन मी अन् शब्दही देईन मी
मुक्त आहे दार माझे, फक्त यावे लागते !

एवढा आलो पुढे की पाय ज्यांनी ओढले
कोण होते ते ही आता आठवावे लागते !!

रोज लाखो चेहऱ्यांनी येत गर्दी हिंडते
माणसाने माणसाला ओळखावे लागते !

-संदीप खरे

Saturday, November 13, 2010

आत्ता जिथे आहे...

आत्ता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही
माझ्याशिवाय कोणासही याचा दोष देत नाही
घडले जे जे; राहीले जे जे; जबाबदारी माझ्यावर
कालच्या चांदण्यांची पुटं फक्त माझ्याच हातावर !
आपण आपली द्यावी साद आणि झाकून घ्यावे कान
इतके सोपे कळत नाही; त्याचा ठरलेला अपमान !
उगाच स्वत:स गंभीरपणे आपण आपले घेत असतो
जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असतो !
प्रारंभाच्या आधीपासून दूर अंत बघत असतो
म्हणून कोणी मरण्याआधीच थोडा रडून घेत असतो !

वार्‍यावरुन गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो
'नको नको' म्हटले तरी ओंजळीतून उचलून नेतो
पायच होतात वार्‍याचे अन् हळूच जमीन सुटलेली
आयुष्यातून उठलेल्याची ओली चिन्हे उठलेली
चालण्यासाठी पायापेक्षा आधी डोळे वापरायचे
देव जाणे असले आम्हा कुठल्या जन्मी समजायचे ?
कळून सवरून पुन्हा पुन्हा असेच सारे घडायचे
आपण फक्त शीळ घालत टोपीत पीस खोचायचे !
झाले गेले असो आता...वाद सारे शून्याकार
आकाश चौकट नसलेले अन् ढगांस ना नक्की आकार...

-संदीप खरे

Sunday, November 7, 2010

साकीचे घर

ही शापित जागा !नकोच येथे येणे
सारखी मागते गतजन्मांचे देणे
दृष्टीच्या पल्याड भिरभिरणारे पक्षी
येतात इथे दर रात्री गाया गाणे

हा पडाव कुठला? कुण्या समुद्रामधला?
कप्तान कोण अन् कोण खलाशी इथला?
भरकटून गेले वार्‍यावर सांगावे
अन् डोळ्यांदेखत तिथे किनारा बुडाला !

घे मिटून डोळे आणि आतुनी जाग
बघ चंद्र असा की ज्यावर नाही डाग
गुणगुणतो प्याला हलके कानामधुनी
जे मनात होते तसाच आता वाग !

बघ लाटांमागून लाटा येती कैक
तो शोध त्यातली लाट आपुली एक
मग उतर समुद्रामध्ये आपुल्या आत
उसळली वादळे त्यात होडके फेक !

मी का हो आलो येथे कोणी सांगा
लागल्या इथे तर मैलोगणती रांगा
मी एकांताचे बेट शोधण्या गेलो
पाहिले तिथेही नसे बोटभर जागा !

हा प्याला, ही मदिराही नश्वर आहे
हे काळ्या दगडावरचे अक्षर आहे
वाटते तरी का असल्या मदीरवेळी
पेल्यातून माझ्या पितो ईश्वर आहे ?

-संदीप खरे