पावसाला पापण्यांशी थोपवावे लागते
सर्व आहे ठीक ऐसे दाखावावे लागते
रोज माझी पाहतो मी प्राक्तने लाटांपरी
गाठण्याआधी किनारा ओसरावे लागते
हाय ! प्रेमातून सांगू काय व्हावे लागते ?
तीर व्हावे लागते अन् लक्ष्य व्हावे लागते!
अक्षरे ना ! शब्द नाही !समजते सारे तरी
पत्र ओल्या पापण्यांनी पाठवावे लागते
गौरकाया राधिकेला 'कृष्ण' व्हावे लागते
होत माती पावसाला साठवावे लागते
भेटही घेईन मी अन् शब्दही देईन मी
मुक्त आहे दार माझे, फक्त यावे लागते !
एवढा आलो पुढे की पाय ज्यांनी ओढले
कोण होते ते ही आता आठवावे लागते !!
रोज लाखो चेहऱ्यांनी येत गर्दी हिंडते
माणसाने माणसाला ओळखावे लागते !
-संदीप खरे
No comments:
Post a Comment