Tuesday, December 21, 2010

प्रेम...

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यांमधले रक्त
ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात
चाकोरीला उध्वस्ताचे घण हवे असतात...

तसे काही चेहर्‍यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते !
ओठांत नाही हवी असते डोळ्यांत एक कथा
हवी असते षड्जासारखी सलग, शांत व्यथा...

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
वरुन खाली कोसळणारी मिंड हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती
प्रेम नाही, हवी असते मला चौथी मिती !...

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चाताप !....

-संदीप खरे

Saturday, December 11, 2010

संधी...

मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी...!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे...

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे...!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे...

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे...

-संदीप खरे

Sunday, December 5, 2010

तोल का जातो?

सावरावे रोज तरीही तोल का जातो?
कोणत्या तार्‍याकडे हा काफिला जातो?

उतरते रात्रीत अर्ध्या कोण स्वप्नांशी?
गाऊनी अर्धेच गाणे रोज का जातो?

एवढा शकुनांवरी विश्वास हा माझा?
रोज एका मांजराला आडवा जातो!

मोजतो माझे उसासे लावूनी काटे
बस जरासा वेळ माझा चांगला जातो!

कैक प्याले रिचवुनिही जो उभा त्याचा
देवळाच्या पायर्‍यांशी झोक का जातो?

-संदीप खरे

Saturday, December 4, 2010

बोलतो ते...

बोलतो ते चूक आहे की बरोबर?
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर?

काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ?
कोणताही रंग का नाही बरोबर?

बांध तू ताईत स्वप्नांच्या उद्याच्या
राख थोडी राहू दे माझी बरोबर

प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
उत्तरे सांगू नये कोणी बरोबर

काळजी घे ! चांदण्याचा झोतसुद्धा
सौम्य कांतीला तुझ्या नाही बरोबर!

चुक तू होतीस हे शाबित होता
काय कळुनी फायदा की मी बरोबर !!

-संदीप खरे