Friday, February 24, 2012

कधीतरी वेड्यागत

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवुन
कशासाठी सजायचे चापून चोपुन?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबु कधी म्हणायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

भांड्यावर भांडे कधि भिडायला हवे
उगाचच सखिवर चिडायला हवे
मुखातुन तिच्यावर पाखडत आग
एकिकडे प्रेमगीत लिहायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

विळीपरी कधि एक चंद्रकोर घ्यावी
हिरविशी स्वप्ने धारेधारेने चिरावी!
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधितरी विचारावाचुन!
झाडापास झोंबुनिया हाति येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्‍याची चाल दैवासारखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

स्वतःला विकुन काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!
हपापुन बाजारात मागशिल किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा!
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजुन, आहे रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

-संदीप खरे

Saturday, February 18, 2012

राधे, रंग तुझा गोरा

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?

राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी.. तरी 'वेडी' कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !

राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी...तिथे मुरारी भिजला !!

डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग...एक " श्रीरंग " उरला !!

-संदीप खरे

Thursday, February 16, 2012

स्मरणशक्ती

अफाट होती तुझी स्मरणशक्ती
तुला नेमके ठाऊक होते, एकमेकांना पहिल्यांदा पाहीले
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन
एकमेकांच्या नजरेत हरवताना
आपण नक्की किती होतो एक का दोन?

तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटने?
कुठल्याचा उसवला होता खिसा?
रात्रभर गाणी म्हणून दाखवताना
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा

तुझ्याशी बोलताना चुकून जांभई निसटली
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ
आणी एकूण किती मायक्रो सेकंद टिकू शकला होता
मुश्किलीने एकमेकांशी अबोला धरण्याचा खेळ

आठवतेका तुला रातराणी शेजारी बसून
कविता म्हणून दाखवताना
फुललेल्या एकूण कळ्यांची संख्या
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या

नेमके आठवत होते तुला
कवितांनी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणांवर
आणी मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही
कुठली कविता कुठल्या पानावर

अफाट होती तुझी स्मरणशक्ती
मलाच कसेकाय विसरलीस कुणास ठाऊक?

-संदीप खरे

Tuesday, February 14, 2012

तो प्रवास

तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो
तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !

तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे
मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !

कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !
कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...

दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो

मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...

-संदीप खरे

Thursday, February 9, 2012

किती झाले ?

रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्‍या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच... '
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? '

८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!

आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त....

-संदीप खरे

Sunday, February 5, 2012

खडक

हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

-संदीप खरे

Thursday, February 2, 2012

शपथ

हाताला धरून, मुसळाशेजारी बसवून,
म्हणाली कविता -
" इथे खाली मान घालून लिही !
अन जोवर फुटत नाही याला अंकुर
तोवर शपथ आहे माझी - वर बघायच नाही !!"

-संदीप खरे