Tuesday, February 14, 2012

तो प्रवास

तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो
तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !

तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे
मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !

कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !
कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...

दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो

मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment