Wednesday, July 28, 2010

वृत्तपत्र...

पोळून निघतायत महिने बारा आणिक वार सात
हल्ली पेपर उचलला की भाजून निघतात हात!
एकेक बातमी होऊन निघते डोक्यावरती घण
सायरनसारखा घणघण वाजत येतो एकेक क्षण!
रोज फुटतायत घरं, फुटतायत नशीबं आणि छाती
रोज रोज तोंडामध्ये कोंबून घ्यायची माती
काहीच वाटत नाहीए कोणा ! काही...अगदी काहीच...
चिरून पडतायत कोवळे गळे काही कळण्याआधीच
जीव घेतंय पाणी आणि घुसमटत्येय ही हवा
चालून येतो रोज नव्या विषाणूंचा थवा
सर्वांगाने फुलून येतेय रोज नवी व्याधी
निर्माल्याच्या वाटा चालतात फुले फुलण्याआधी
दिवसाढवळ्या गर्दी खेचतायत निर्लज्जांचे वग
आत्मा झालाय हावरटांच्या बाजारातील नग
लांडग्यांसारखे डोळे आणि हपापलेले ओठ
आकाशाहून मोठे येथे अधाश्यांचे पोट
विकत चाललेत साले...सारे विकत विकत जातायत
उलटी व्हायची वेळ आली तरी गिळून घेतायत
विकतायत लाज, विकतायत स्वप्नं, विकतायत त्वचा आख्खी
विकतायत आकाश, विकतायत जमीन, विकतायत नाती सख्खी
ताबे हवेत मन, हृदय, मेंदू, श्वासांवरती
ताबे हवेत अश्रू, घाम आणिक रक्तावरती
ताबे हवेत संस्कृत्यांवर, शास्त्र, कलांवरती
ताबे हवेत बर्फ, चिखल, वाळू, पाण्यावरती....
....
...केस मोकळे सोडून पृथ्वी वेड्या बाईसारखी
गरगर फिरवत डोळे मारत्येय स्वत:भोवती गिरकी
चिघळत चालल्येय एकेक जखम...सोसण्यापल्ल्याड कळा
चिरून घेत्येय आपल्या हाती रोज आपला गळा...
पोळून निघतायत महिने बारा आणिक वार सात
हल्ली पेपर उचलला की भाजून निघतात हात!
-संदीप खरे

Saturday, July 17, 2010

कविता

ती त्याची सच्ची मैत्रीण
ती त्याला पंख देते
आयुष्याला ठनकावणारा
गोड, जहरी डंख देते

तीच त्याच्या गालावरती
पाच बोटांचे वळ देते
तीच त्याच्या पोटर्‍यामध्ये
आंधलेसे बळ देते

तीच दूर प्रस्थानातील
उत्सुक, नवी चव देते
तीच त्याचा प्रवास आणि
पोहोचायाचे गाव होते!

ती काही लिहीण्याआधी
बोटांमधला कंप होते
तीच 'नाही सुचत' म्हणत
कागद फाडून रंक होते!!

-संदीप खरे

Thursday, July 15, 2010

गंगेत न्हायले घोडे...

शब्दांची ओंजळ व्हावी क्षण ऐसे आले थोडे
अन् आले जेव्हा तेव्हा गंगेत न्हायले घोडे

हा जन्मच अवघा आहे शब्दाशब्दांच्यासाठी
जगण्याच्या दोरावरती कवितेच्या बसल्या गाठी

ह्या गाठी सोडवताना मोकळा होई जणू दोर
कवितेचते नेसून नेसू नागवे नाचले पोर

नागवेच ते रे अंती! रे त्याला लज्जा कसली?
मग लाज राखण्या त्याची शब्दांनी कंबर कसली!

हे शब्दच असती त्याचे करुणाकर आणि मुरारी
हे शब्दच होती त्याच्या निद्रेखालील पथारी

हे वस्त्र पुरवती त्याला हे होती सौंगडी त्याचे
हे मद्याचे घट होती, हे होती ओठ दुधाचे!

ह्या अथांग मैदानात तो आधी नाचत गेला
अन् अर्थ शेपटी होत मागून फरफटत गेला

हे आहे ऐसे तरीही, नेहमी न ऐसे होणे
प्रत्येक वेळी ना फिटते त्याचे मातीचे देणे

म्हणूनीच उपाशी झुरणे, अन् वाट सदाची बघणे
अज्ञात प्रदेशासाठी श्वासांना बांधून धरणे

जिव करपवून घेणारे कुणी होऊन गेले वेडे
हा सध्याचा कुणी वेडा, कुणी अजुन होतील वेडे!!

-संदीप खरे

Friday, July 9, 2010

म्हणून...

माणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची
वाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची
घुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..
कुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..
कुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आडनावाला नव्या कॉम्बिनेशनची गरज होती...
घराण्याच्या ओटीपोटाला गर्भकळांची हौस होती...
पृथ्वीवरल्या मानवी जननदराची सर्वसाधारण संख्या
एकाने कमी पडत होती
म्हणून आम्ही जन्मा आलो!

भूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..
भाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..
डॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने टिकवायचा होता...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कारण काहीच नव्हते पण घडायचे होते...
घडणार नव्हते काहीच पण थांबायचे होते...
काहीतरी व्हायचे नव्हते पण काहीतरी व्हायचे होते...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आभाळाला कुणीतरी विचारायला हवं...
सारं बघणा-याला "मी ही बघतोय" हे सुनवायला हवं...
तुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी
ठणकवायला हवं...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

-संदीप खरे

Sunday, July 4, 2010

मला कविता कळलीच नाही...

कवीसंमेलनात उत्तम,भरजरी गर्दी, सेंटचे सुवास
पुढच्याच खुर्चीत एक सजलेल सौंदर्य...
तिथून नजर वळलीच नाही...
मला कविता कळलीच नाही...

स्टेजवर रेशमी साड्या, रेशमी झब्बे
पथ्यपाणी सांभाळलेल्या शोभीवंत रचना
डोळ्यांना बरं वाटलं, कानांना मझा आला...
छातीची कडी निघालीच नाही...
ओळींचे ओघळ ओघळले खूप,
जन्माची झोप जावी अशी मुस्काडित बसलीच नाही...
मला कविता कळलीच नाही...

आताशा 'कविता आईच्या नावानं चांगभलं' म्हणून
मी ही चढवतो शब्दांचे बळी,
दिवस उगवत राहतात... वारा वाहत राहतो...
बदलत काहीच नाही...
अस्सल श्रमांचा दरदरुन घाम येत नाही...
आपल्यामुळे कोणी जन्माच सुखी होत नाही..
'भाषा' लिहिण्यात गुंतलेल्या हातांना
कवितेसाठी वेळ रहात नाही...
आभाळस्वप्नांना छातीवर घेऊन
रक्त ओकण्याची हिंमत नाही...

तडजोड कळली...
भातपोळी कळली..
उबदार रजईची किंमत कळली...
पण
लाल डोळ्यांनी स्वत:वरच घाव घालत
उभा जन्म जाळून
निदान एक अस्सल फुंकर पैदा करण्यात
कसली सार्थकता लागते कळलेच नाही...
मला कविता कळलीच नाही...

-संदीप खरे

Thursday, July 1, 2010

कोणीही नसतं...

कोणीही नसतं आपण पोहोचतो तेव्हा...
निघून गेलेले असतात मैफिलीचे प्राण !
रस्त्यावर उतरतो आपण
आपल्या निराश पावलांसकट
आपल्याच कविता आपल्याला म्हणून दाखवत
आणि आपल्याच शब्दांचे अर्थ
आपल्याच मेंदूच्या पेशीपेशीपर्यंत पोहोचवत...

रस्ताभर चमकत असतो
चांदण्यांचा चमचमणारा चिखल...
वेश्येच्या मनात विझून जावी चंद्रकोर
तसे नाकारत जातो आपण
कुठल्याही स्वप्नांचे स्वामित्व...
रस्त्यावरचे एकाकी कुत्रे
पहात असते त्याच्या करून टपोर्‍या डोळ्यांनी
आपल्या दमलेल्या श्वासांची आवर्तने...
एकेक ओझी कमी करूनही
वाढत चाललेला भार समजत नसतो मेंदूला...

हात सुटला की सुटते साथ
साथ सुटला की फाटते वाट
वाट भर दूर दूर
मृगजलांचे महापूर
सूर सुटला की महापूर;

कोणीही नसतं आपण एखादा महापूर झेलतो तेव्हा..
डोळ्यांच्या पातळीपर्यंत पोहोचलेल्या
लालगढूळ लाटांच्या पाठीमागून
सरकत जाताना दिसतात
किनार्‍यांमागून किनारे...

कोणीही नसतं आपण पोहोचतो तेव्हा...
मैफिल संपून गेलेली असते
किंवा सुरुच व्हायची असते अजुन कदाचित !
आणि आपणही नेहमीसारखेच
काळाच्या खूप मागचे
किंवा पुढचेही कदाचित...

...रस्त्यांवर उतरतो
आपल्या निराश पावलांसकट;
कुत्र्याच्या करून टपोर्‍या डोळ्यांमधले
एकटेपणाचे फूल खुडून घेतो
पाझरत्या रात्रीच्या खोल विहिरीत...

-संदीप खरे