Sunday, September 26, 2010

उशीरा उशीरा

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामूक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते
तिने पाहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !!

जिवा गुंतवू पहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन् नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा !!

अता प्राक्तानाचा उजाडेल तारा, किती जागूनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदअंती कराव्या कशाला ?
मला सत्य आधीच ठावूक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा !

गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही, जरी दोर जळले उशीरा उशीरा !

-संदीप खरे

Sunday, September 19, 2010

मी

गरीब,बुटका,कद्रू,कर्कश,कटकटवाणा
अवघड,हट्टी,हेकट आणि माणूसघाणा

भनंग,भूक्कड,पूर्ण फाटका,तुटका फुटका
कळाहीन अन् रंगहीन अन् सदैव विटका

मस्तवाल अन् भोंदु,पोकळ,मिजासवाणा
पिचका मणका,लेचापेचा,केविलवाणा

कपटी,हलकट,हलगर्जी अन् स्वार्थी,लोचट
चंचल,अस्थिर,मूर्ख,आळशी उथळ नि खवचट

ठाऊक मज मी ऐसा तरिही खुशाल फिरतो
मी ही आहे 'ईश्वरनिर्मित' इतुके म्हणतो...!!

-संदीप खरे

Sunday, September 12, 2010

कुणी अभंग म्हणता...

कुणी अभंग म्हणता मन ओसंडून जाते...
कुणी म्हणता ओवी डोळा पाणी येते...
मी देव हरवला कधीच माझ्यामधला...
ती जुनी कहाणी पुन्हा नव्याने स्मरते!

या वैराणातून कधी बगीचा होता...
स्वर ढाला माझा कधी टिपेचा होता...
प्रार्थना जायच्या थेट नभाशी तेव्हा...
घन भरला; केवळ बरसायाचा होता!

मी निरांजनेही कधि लावली होती
अन् स्तोत्रामधुनी फुले ठेवली होती !
कळले न कधी विझलीच सवय श्रद्धेची
जी अंधारातील एकच दिवली होती!!

काजळीच केवळ दिव्यात उरली आता
काळजी काळजावरी उतरली आता!
गोंगाट असा या देहाने मांडीयला
आवाज आतला ऐकू न येई आता!!

भोगात म्हणावे रमलो तर का ऐसे?
मी 'हवे हवे' म्हणताही सर्व नकोसे?
बेशुद्धीला ही शुद्ध कुणाची उरली?
हे कोण टाकते अजुनी आत उसासे?

ही कसली थरथर अजुन अधरावरती?
ही कसली लाली अजुन रूढीरावरती?
हे कोण बोलते अजुन माती ओळी?
हा कसा शहारा अजुन बधिरावरती?

कुणी अभंग म्हणता मन ओसंडून जाते...
कुणी म्हणता ओवी डोळा पाणी येते...

-संदीप खरे

Sunday, September 5, 2010

निर्मम

माझ्या चुकांबद्दल संपूर्ण शरणागती
पत्करणार नाही मी...
अथवा तुझ्या चुकांकडूनही अपेक्षित नाही मला
कसलीही साश्रू कबुली!
इर्षेने भांडावे..पटवावे अथवा पटवून घ्यावे
असले तत्त्वच निघून गेले आहे आयुष्यातून...
दुसर्‍याइतकेच स्वत:चे शरीर वागणेही
दिसू लागले आहे दुरून...
आता इतक्या पटकन,सहज
कुणावर दगड फेकु शकत नाही मी...

जळत्या उदबत्तीला उरलेल्या राखेचे अप्रूप
तेवढेच माझ्यासाठी तुझे-माझे पश्चाताप
तुझे-माझे आदर सन्मान!
काहीच नाही असे आता ज्यावाचून अडेल;
हातात तलवार देताना लक्ष्य आधीच सांगा
अन्यथा माझेच मुंडके ही
तितक्याच निर्ममतेने उडेल!...
जिवाला जीव देणे
अथवा जीवासाठी जीव घेणे;
एकाच दुतोंडी सापाची दोन तोंडे फक्त!
मागेपुढे सरपटत राहण्यला
आयुष्याची यात्रा म्हणावी
इतका निष्पाप,निरागस राहिलो नाही मी!...

सर्वोत्कृष्ट शत्रू करू शकेल
त्याहूनही मी जास्त करतो माझा तिरस्कार;
तेव्हा आता अंगावर खरचटत नाहीत कुणाची दूषणे
वा मोरपिसागत हूळहूळत नाहीत स्तुतीची आभूषणे...
तुझे स्तुती-शाप केव्हा ऐकू मित्रा?
माझ्याच एका मोठ्या गदारोळातून
केव्हाचा मलाच ऐकू पाहतो आहे मी...

चुक तुझी असेल अथवा माझीही...
किंवा काही काळानंतर
मुळात 'चुक' असे काही नसेलही...!
शरण येणार नाही इतक्यासाठीच
की हारल्याची खात्री नाही;
वा स्वीकारणार नाही शरणचिठ्ठी
कारण जिंकलो हे ही निश्चित नाही!
कुठल्या शब्दाकृतीला नसतो
काळनिरपेक्ष, स्वावलंबी अर्थ
तोवर झूठ आहे
कुणावरही, कशासाठीही
शिरा ताणून ओरडने...!
माझ्याकडून तुला असलेल्या
किमान तिरस्कारच्या अपेक्षेतूनही
मोकळे करतो आहे तुला...
निराश होताना विसरू नकोस
अगदी माझ्यासारखाच आहेस तू
आणि अगदी तुझ्यासारखाच मी...!
........
माझ्या चुकांबद्दल संपूर्ण शरणागती
पत्करणार नाही मी...

-संदीप खरे

Thursday, September 2, 2010

स्वप्न-६

आयुष्यात मलाही एकदाच पडले होते
एक सर्वांत सुंदर स्वप्न
ज्यात मी गाढ झोपलो होतो...स्वप्नविहीन!...

-संदीप खरे

Wednesday, September 1, 2010

स्वप्न- ५

स्वप्नांचा पडदा वर जाईल
स्वप्नांतली माणसं
स्वप्नांतले सूर घेऊन
एखादा स्वप्नसुंदर अनुभव देतील
स्वप्नांतले प्रेक्षक टाळ्या वाजवतील!
त्या टाळ्यांनी जाग येईल
तेव्हा उरेल स्वप्नात नाटक पाहणारा एक माणूस!
ज्याला अजुन एक जाग येईल
आणि मग उरेल
स्वप्नामध्ये
स्वप्नात नाटक पाहणारा एक माणूस!
अजुन एक जाग येईल...अजुन एक...अजुन एक
मग या उतरंडीच्या खाली उरेल एक माणूस
ज्याला स्वप्न पडण्यासाठी झोप हवी आहे
आणि पडलेल्या स्वप्नांनी ज्याची झोप गेली आहे!
कदाचित अजुन एक जाग येईल
आणि एकेक जाग ओलांडत तो भरभरा धावू लागेल
सरकत्या पट्टीवर धावणार्‍या माणसासारखा
'जाग'च्याजागीच...
जाग...झोप...जाग...झोप...
अशी स्टेशने मागे टाकत...
जसे आपण आत्ता करत आहोत...!!!

-संदीप खरे