Sunday, March 28, 2010

बधीरतेचे श्लोक

चला चांगले चांगले अन्न खाऊ
तशी सरबते थंड ग्लासात घेऊ
जलो उदबत्ती लूटू गंध त्याचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

उपाशी बिपाशी असो कोणी कोठे
मनाला नको जाणीवांचे धपाटे
भुकेले मरो कोणी घासून टाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

कुणी मुक्त आहे, कुणी बद्ध आहे
कुठे युद्ध आहे, कुठे बुद्ध आहे
नको भार माथा कुणाचा कशाचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

कधी उन्ह आहे, कधी पूर आहे
मना यात काही नवे काय आहे?
असे दोष कर्माहुनी प्राक्तनाचा!
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

कुणी भ्रष्ट होते, कुणी ठार होते
अशी पेपरे रोज भरतात येथे
नको खंत रे तोच व्यवसाय त्यांचा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

पहा ढीग तो लष्करी भाकरयांचा
नको रे मना छंद तो भाजण्याचा
जराही उडावा न टवका स्वत:चा !
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

मुखी दाढ दुखते खरी ती व्यथा रे !
व्यथा अन्य त्या सर्व केवळ कथा रे !
निदिध्यास तो फक्त लागो स्वत:चा
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले
म्हणोनि तुझे घास सुग्रास झाले
न सोडि कधी कोश हा रेशमाचा !
इथे रंगू दे रंग या जिंदगीचा

-संदीप खरे

Thursday, March 25, 2010

सारे अर्थहीन होता

वाटे खोडावासा देह
आणि उडू द्यावे रक्त
सामावून राहो जीणे
एका बिंदुमध्ये फक्त

आले तळहाती जीणे
झाले अती ओळखीचे
सारे रंग,सारे घाट
सरावाचे, माहितीचे!

आता भातुकलीतून
जीव रंगेनासा झाला
रावा हिरावासा उरी
साद देईनासा झाला

नको वाटू झाली आता
रोज आरशाला भेट
होत गडद चालली
भाळी आठीतली वाट

जीव ठेवावा रमता
असे काही नसतेच
सौंधातली संध्याकाळ
बोलू लागे भलतेच!

नको व्याख्या,ठोकताळे
नको कसली उपाधी
काळ्याभोर ओळींकाठी
माझी उरावी समाधी

सारे अर्थहीन होता
आला जगण्याला अर्थ
गेला अंधारला शब्द
तरी तो ही नसे व्यर्थ!

-संदीप खरे

Tuesday, March 23, 2010

निर्माल्य

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता बायको ओरडते
मध्यरात्री कुत्रे ओरडतात
पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता कविता आठवते
मध्यरात्री प्रेयसी आठवते
पहाटे पहाटे अंथरूण ओली करणारी धाकटी आठवते
अन् उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता मद्यात असते
मध्यरात्री गद्यात असते
पहाटे पहाटे पद्यात असते
अन् उजाडता उजाडता पुन्हा एकदा 'सध्यात' असते…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता कळी असते
मध्यरात्री फुलन्याची इच्छा असते
पहाटे पहाटे कळीचं फूल असते
अन् उजाडता उजाडता फक्त निर्माल्य असते…

-संदीप खरे

Monday, March 22, 2010

राखण

तुला चालायची | रोज हीच वाट |
रोज हीच वात | वलायची ||

हाकारती तुला | जरी दिशा दाही|
म्हणायचे 'नाही'| थंडपणे||

जाऊ तिथे खाऊ | रोज शिव्या शाप |
मुर्दाडला राप | मनावर ||

दिवे मागे तेल| तेला लागे मोल|
कुणा कुणा बोल | लावायचे ||

नको त्याला नको | तिथे बसवले |
काय गा हे केले | विश्वंभरा? ||

आता एक कर | व्यथा सार्‍या माझ्या |
दारी ठेव तुझ्या | राखणीला ||

-संदीप खरे

Saturday, March 20, 2010

खात्री

मला बोलायची कसलीच घाई नाही….
कारण माझा शब्द यथावकाश
पोहोचणारच आहे तुमच्या पर्यंत
या ना त्या वळणापाशी…!

अतीव आनंदाच्या, अतीव दु:खाच्या
अतीव निराशेच्या, अतीव रागाच्या,
अतीव करुणेच्या, अतीव प्रेमाच्या…
..किंबहुना कुठल्या ही आत्यंतिक
भावनेच्या चाळणीतून खालपर्यंत
उतरलेला तुमचा शब्द…
खरं तर माझाच असेल…!!

-संदीप खरे

Friday, March 19, 2010

कसा त्याचा स्वर

कसा त्याचा स्वर…आभाळघर
कसे त्याचे घर…वार्‍यावर
तूटतात जुळतात आत त्याच्या वाटा
कधी नाही मन त्याचे थार्‍यावर

दरीभर उधळत हिरवेसे हसे
डोंगराच्या रेघेवर एकटाच बसे
काही ओले, काही सुके खुणावता मग
उन्हावर लपेटतो भरलेले ढग

बोलावून बोलावून म्हणे बोलू काही
आणि पास जाता म्हणे बोलावत नाही
ओठांवर लागे असे अजब कुलुप
जीभ झाली किल्ली ती ही आतच गुडूप !

एका वाटेसाठी त्याच्याकडे लाखो पाय
रोज नवा प्रश्न मागे नवाच उपाय !
अशी लागे धून काही उमगत नाही
समजले हे ही त्याला समजत नाही !

-संदीप खरे

Wednesday, March 17, 2010

कुठे 'ग्रेस' कळला आम्हांस?

कुठे 'ग्रेस' कळला आम्हांस? कुठे 'बा.सी.' भेटले ?
कुठे 'भट', 'विंदा', 'बापट', 'आरती प्रभू' पावले ?
कुठे वाचल्या कविता तरी पोटापाण्यास लागलो
कुठे कळल्या उपमा ? तरी पहिली रात्र जागलो !
भुई मध्ये उकरताना आयुष्याचा कंद
कुठले गण? कुठल्या मात्रा? कुठले वृत्त- छंद ?
ठाऊक असते एवढेच, आमच्या मधलेच कोणीतरी
वागत असते मनात ठेऊन वाजती एकतारी !
वर म्हणा, शाप म्हणा, असतो त्याचा त्याचा
चमत्कारासारखा आमचा भरून जातो ओचा !
काय' ? कळत नाही…' काही आहे' इतके कळते
…कळते आपल्या घरापुढून एक वाट वळते
दिवस सरुन निजेस येतात अंगणामधली झाडे
आळस देत असतो तेव्हा चाकोरीचा जीव
नीजे भोवती तथा कथित साफल्याची शीव
पंख मिटत असतात पाखरे, मिटत असते सावली
कळत जाते- लावायची राहून गेली दिवली !!

-संदीप खरे

Monday, March 15, 2010

चुकले कुठे…माहित्ये ?...

चुकले कुठे…माहित्ये ?...
बिनचूक भिडल्या होत्या
भिवयांच्या तरहा…
बिनचूक भिडले होते डोळ्यांना डोळे…
अन् बिनचूक जाणून घेतली होती
ओठांनी ओठांवर रेलुन ओठांची भाषा…
विश्वासाने आला नाही तो केवळ हातात हात
आईच्या खांद्यावर निशंक रेलणार्‍या अर्भकासारखा
अन्यथा..
प्रत्येक जन्माच्या तळाशी दडलेल्या…
त्या अतृप्त ज्वाला मुखीच्या धगीने
कदाचित दोंघांच्या हातावरल्या
भिन्न भिन्न नशीब रेषा ही
एकत्रच वितळून
झाल्या असत्या
एकमेकांसारख्या
एकमेकांसाठी…!
चुकले कुठे…माहित्ये ?...
अन् सोन्याच्या हृदयांची नक्की किंमत
माहीत असलेले असंख्य सच्चे देवदूत
चुकचुकले कुठे….माहित्ये ?...

-संदीप खरे