Tuesday, March 23, 2010

निर्माल्य

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता बायको ओरडते
मध्यरात्री कुत्रे ओरडतात
पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता कविता आठवते
मध्यरात्री प्रेयसी आठवते
पहाटे पहाटे अंथरूण ओली करणारी धाकटी आठवते
अन् उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता मद्यात असते
मध्यरात्री गद्यात असते
पहाटे पहाटे पद्यात असते
अन् उजाडता उजाडता पुन्हा एकदा 'सध्यात' असते…

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
ती होता होता कळी असते
मध्यरात्री फुलन्याची इच्छा असते
पहाटे पहाटे कळीचं फूल असते
अन् उजाडता उजाडता फक्त निर्माल्य असते…

-संदीप खरे

No comments:

Post a Comment