Friday, March 19, 2010

कसा त्याचा स्वर

कसा त्याचा स्वर…आभाळघर
कसे त्याचे घर…वार्‍यावर
तूटतात जुळतात आत त्याच्या वाटा
कधी नाही मन त्याचे थार्‍यावर

दरीभर उधळत हिरवेसे हसे
डोंगराच्या रेघेवर एकटाच बसे
काही ओले, काही सुके खुणावता मग
उन्हावर लपेटतो भरलेले ढग

बोलावून बोलावून म्हणे बोलू काही
आणि पास जाता म्हणे बोलावत नाही
ओठांवर लागे असे अजब कुलुप
जीभ झाली किल्ली ती ही आतच गुडूप !

एका वाटेसाठी त्याच्याकडे लाखो पाय
रोज नवा प्रश्न मागे नवाच उपाय !
अशी लागे धून काही उमगत नाही
समजले हे ही त्याला समजत नाही !

-संदीप खरे

No comments:

Post a Comment