वाटे खोडावासा देह
आणि उडू द्यावे रक्त
सामावून राहो जीणे
एका बिंदुमध्ये फक्त
आले तळहाती जीणे
झाले अती ओळखीचे
सारे रंग,सारे घाट
सरावाचे, माहितीचे!
आता भातुकलीतून
जीव रंगेनासा झाला
रावा हिरावासा उरी
साद देईनासा झाला
नको वाटू झाली आता
रोज आरशाला भेट
होत गडद चालली
भाळी आठीतली वाट
जीव ठेवावा रमता
असे काही नसतेच
सौंधातली संध्याकाळ
बोलू लागे भलतेच!
नको व्याख्या,ठोकताळे
नको कसली उपाधी
काळ्याभोर ओळींकाठी
माझी उरावी समाधी
सारे अर्थहीन होता
आला जगण्याला अर्थ
गेला अंधारला शब्द
तरी तो ही नसे व्यर्थ!
-संदीप खरे
No comments:
Post a Comment