Saturday, December 11, 2010

संधी...

मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी...!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे...

प्रयत्न तर खूप केले आणि करतोही आहे मी
की तुझे नाव घेताना तुझ्यावाचूनही
मन गाभार्‍यासारखे गंधित होत राहावे
पण
तळहातीच्या रेषांसारखे चिकटून बसलेले
काही शब्द, काही घटना
हाणून पाडतायत माझा बेत
असो ! ढासळलेल्या बेतांचा एक डोंगर साचलाय इथे
त्यात ही काडी काही जड नव्हे...!

नशिब हातात नसले तरी
प्रार्थना आहे!
आणि माणसाच्या स्मरणशक्तीपेक्षा
विस्मरणशक्तीवर माझा भरवसा आहे...

तो ही तूटणार असेल कदाचित;
पण तोवर
मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment