Saturday, November 13, 2010

आत्ता जिथे आहे...

आत्ता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही
माझ्याशिवाय कोणासही याचा दोष देत नाही
घडले जे जे; राहीले जे जे; जबाबदारी माझ्यावर
कालच्या चांदण्यांची पुटं फक्त माझ्याच हातावर !
आपण आपली द्यावी साद आणि झाकून घ्यावे कान
इतके सोपे कळत नाही; त्याचा ठरलेला अपमान !
उगाच स्वत:स गंभीरपणे आपण आपले घेत असतो
जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असतो !
प्रारंभाच्या आधीपासून दूर अंत बघत असतो
म्हणून कोणी मरण्याआधीच थोडा रडून घेत असतो !

वार्‍यावरुन गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो
'नको नको' म्हटले तरी ओंजळीतून उचलून नेतो
पायच होतात वार्‍याचे अन् हळूच जमीन सुटलेली
आयुष्यातून उठलेल्याची ओली चिन्हे उठलेली
चालण्यासाठी पायापेक्षा आधी डोळे वापरायचे
देव जाणे असले आम्हा कुठल्या जन्मी समजायचे ?
कळून सवरून पुन्हा पुन्हा असेच सारे घडायचे
आपण फक्त शीळ घालत टोपीत पीस खोचायचे !
झाले गेले असो आता...वाद सारे शून्याकार
आकाश चौकट नसलेले अन् ढगांस ना नक्की आकार...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment