Sunday, November 7, 2010

साकीचे घर

ही शापित जागा !नकोच येथे येणे
सारखी मागते गतजन्मांचे देणे
दृष्टीच्या पल्याड भिरभिरणारे पक्षी
येतात इथे दर रात्री गाया गाणे

हा पडाव कुठला? कुण्या समुद्रामधला?
कप्तान कोण अन् कोण खलाशी इथला?
भरकटून गेले वार्‍यावर सांगावे
अन् डोळ्यांदेखत तिथे किनारा बुडाला !

घे मिटून डोळे आणि आतुनी जाग
बघ चंद्र असा की ज्यावर नाही डाग
गुणगुणतो प्याला हलके कानामधुनी
जे मनात होते तसाच आता वाग !

बघ लाटांमागून लाटा येती कैक
तो शोध त्यातली लाट आपुली एक
मग उतर समुद्रामध्ये आपुल्या आत
उसळली वादळे त्यात होडके फेक !

मी का हो आलो येथे कोणी सांगा
लागल्या इथे तर मैलोगणती रांगा
मी एकांताचे बेट शोधण्या गेलो
पाहिले तिथेही नसे बोटभर जागा !

हा प्याला, ही मदिराही नश्वर आहे
हे काळ्या दगडावरचे अक्षर आहे
वाटते तरी का असल्या मदीरवेळी
पेल्यातून माझ्या पितो ईश्वर आहे ?

-संदीप खरे

No comments:

Post a Comment