Tuesday, February 15, 2011

कसे वाटते...

कसे वाटते सांग मला छळताना ?
मला जाळुनी पुन्हा स्वत: जळताना !

मजा वाटते आणि रागही येतो
शर्यत संपून गेल्यावर पळताना !

तुला पुरावे मिळतील मी असण्याचे
मी नसताना अश्रू ओघळताना !

तुझियावरती पाऊस कोसळताना
आज पाहिले पाणी विरघळताना

एकही नव्हता सोबत गर्दीमधला
वळणापाशी शेवटच्या वळताना !

उल्लू नव्हतो ! स्वत:स रमवत होतो
आस्तिक होऊन मस्तक आदळताना !

नव्या नव्या मज ओव्या सुचती रोज
जुनेच जगणे पुन्हा पुन्हा दळताना !

बघत राहिले जग पेल्यातुन माझ्या
वाफ मामुली विराट वादळताना !

-संदीप खरे

No comments:

Post a Comment