Wednesday, February 9, 2011

नकोस भांडू जगासवे

नकोस भांडू जगासवे अन् नको उगा हट्टाला पेटू
वृधत्त्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू !!

फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा ! कर्तव्यांचा !
सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जिण्यांचा !
आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू !

बऱ्याच शिल्लक गप्पा, हसणे आणिक रडणे रुसणे देखिल !
स्थळकाळाचे भान पुसोनी केवळ सोबत असणेदेखिल !
सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू !!

अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख ?
देहच रुचतो आणिक सुचतो ! देहच अस्तित्वाची ओळख !
कसली भीती विरता यौवन ? भरता घागर ? सरता हेतू !...

नको भेट ही आत्ता तरिही, नको पुढिल जन्माचे बोलू
कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन् केव्हा भेटू ?
जन्म सांगतो, एका जन्मी जळून घे अन् विझून घे तू !

-संदीप खरे

2 comments: