Sunday, February 20, 2011

वंदन

मज येते सारे एकच मी का सांगू ?
आभाळजिण्याला एकच ढग का मागू ?
ही नक्षत्रे अन तारे पूर्वज माझे
का कवडीकवडीसाठी क्षुल्लक वागू ?

जे जगण्यासाठी करती लाख बहाणे
घालीन तयांना अगदी सुलभ उखाणे
पडलेच कधी ना असल्या प्रश्नांवरती
हसतील तयांचे दिसतील दात दिवाणे !

मी श्वास मोजतो येत्या लाटांवरती
उच्छ्वास म्हणजे मृत समुद्र भरती !
नशिबाच्या लपल्या खडकावरती येथे
फुटतात गलबते स्वप्न कुणी ज्या म्हणती !

मी आर न येथे पार न ऐसा आहे !
जो नको कुणाला असा भरंवसा आहे !
माझ्याविन कुठला डाव कधी न अडला
पडला न कधी मी ऐसा फासा आहे !

मी माझ्यासाठी तणाव खासा आहे !
मी दुसऱ्यांसाठी बनाव खासा आहे !
ना फक्त जगाला, स्वत:सही जो छळतो
मी असला हट्टी स्वभाव खासा आहे !!

या दारी येते रोज चांदणी एक
ती गतजन्मांच्या पुण्याईची लेक !
या भेटीसाठी केवळ तुटक्या फुटक्या
मी घरात माझ्या रोज घालतो खेप !

जळते दुसऱ्यास्तव ते तर चंदन आहे
रडणे आपुल्यास्तव वृथाच क्रंदन आहे
कळलेच कधी ना कोणासाठी जगला
त्या माझ्या जन्मा माझे वंदन आहे !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment