Saturday, June 25, 2011

झोप

झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

बायको...मुलगी...नातवंडं...पतवंडं...
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून...माजघरातून...
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून...
मिटक्या मारतायत...!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर...
करंडीत रचून ठेवलेल्या स्तब्ध सफरचंदांसारखे
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

कुशीवर...पाठीवर...पोटावर...
उतरत्या झोपेसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा तळ...!
भरून निघतायत ओल्या सुक्या जखमा, शरीरांच्या झिजा...
तयार होतायत पोटात आपसुकपणे आयुष्याचे रस...अन्न पचतंय...
बाळ मोठी होतायत...केस पिकतायत...हळू...हळू...
रेल्वेच्या एअरकंडीशन्ड डब्यात बसल्यासारखा
किती शांतपणे पार पडतो आहे
अंतापर्यंतच्या प्रवासातला हा निद्रेचा टप्पा...

रोजच्या रोज अनेक अंगांनी छळून छळून घेताना
'टाईम प्लीज' म्हणत स्वत:लाच सूत दिल्यासारखे...
'जगण्याचा आळ नको अन् मेल्याचे दु:ख नको' म्हणत म्हणत
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment