Sunday, June 19, 2011

तथास्तू !

सारे करून थकल्यावरती रेंगाळशीलच टाकत श्वास
मागे बघत पाऊलखुणा शोधात राहशील सत्याभास
'इतके चालत आलो आपण? 'म्हणशील चोळत आपले पाय
'वाटेमधले इतके पक्षी, झाडे...त्यांचे झाले काय ?'
त्यांच्यासाठी इतकाच रस्ता, इतकेच अंतर असते जाणे
आपण आपले मानत अस्सल नंतर होतो केविलवाणे !
अंगांगाचा दाहक टाहो, डोळे थिजून होतील थंडी
डोक्यावरती सूर्यास्ताची उजळत असेल झुंबरहंडी
पाखरे उगाच चुकली माकली घरटी शोधात असतील हिंडत
तळे- ते ही गदगदलेले...पायांवरती लाटा सांडत
आणखीन होशील उदास उदास, मनात खोल मावळशील
दगड, डोंगर, झाडे, वाटा....ह्यांच्याइतका साकळशील
तेव्हा दुरून बघणारा मी, हलके हलके देईन हात
रक्तामध्ये फुंकिन वारा...शरिरातील सरकाविन वात
मागता मागता थकून जेव्हा म्हणशील - 'आता नकोच घेणे !'
तेव्हा गुपचूप देऊन टाकेन 'तथास्तू' चे अंतिम देणे !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment