Sunday, April 18, 2010

हसा बाई हसा

हसा बाई हसा
थोडा वेळ बसा
बसलात तरी सुद्धा पाहु नका वाट
नका पाहु वाट तरी घोडे येती सात

बसा बाई बसा
पाठीवर बसा
पाठीवर बसूनिया जावा दूर दूर
झाकायचे डोळे तरी दिसतील पूर

दिसा बाई दिसा
कोणीतरी दिसा
कोणीतरी दिसा ज्याच्या टोपीमध्ये पीस
ओठामध्ये शीळ आणि झळा काखोटीस !

शिळा बाई शिळा
वेळूभर शिळा
वेळूभर शिळा त्याची ओली ओली झिंग
शिळेवर गाणे झुले, गाण्यावर अंग!

झुला बाई झुला
वर खाली झुला
झुल्यावर गहानीत टाका प्राण पाच
रोज रोज पायाखाली फुटायाची काच

फुटा बाई फुटा
एकदाचे फुटा
एकदाचे फुटा, कळो एकदाचे खरे
कावळ्याच्या शेपटीला मोरपिशी तुरे

पिसा बाई पिसा
जीव वेडा पिसा
जीव वेडा रोज एका घोड्यावर स्वार
जाता जाता करायचे हवेमध्ये वार

करा बाई करा
काहीतरी करा
काहीतरी करा किंवा करू सुद्धा नका
बिनचुक पडे तरी छातीमध्ये ठोका

पडा बाई पडा
आता तरी पडा
ठेवा जरा जीव आणि करा लांब पाय
समजले सारे…त्यात हसायचे काय !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment