Wednesday, April 28, 2010

हॅंग ओव्हर

सकाळ झाली…
कोवळी कोवळी उन्हे पसरली आहेत परत…
घर आवरतो आहे परत स्वच्छ
पण खरंच 'आवरता' येणार आहे का हे घर ?...

वस्तू पोचल्या आहेत जागच्या जागी
कॅसेट्सच्या जागी पोहोचल्या आहेत कॅसेट्स
आणि 'मी त्यातला नाहीच' असा साळसूद टेप…
जमिनीवर जाणवत आहेत अजुन
घरभर पसरलेल्या उदास गझला…
भिंतीवर चिकटलेल्या,झुंबर झालेल्या…
दारुनी ओलेत्या मनाला
जरा जास्तच बसतो गझलचा शॉक…!!

गच्चीतल्या धुळीत उतरले आहेत
माझ्याच पावलांचे वेडे वाकडे ठसे…
मी इतका अस्ताव्यस्त चाललो?
पण विश्वास ठेवणे भाग आहे !
आता हे नीट झाडून ठेवण्यापूर्वी
फोटो काढून ठेवावा का ह्यांचा?
येती' त्या पावलांचा ठेवतात तसा ?

मला वाटते आहे
की एखादा प्रलय बिलय होऊन
हे सगळे घर, हे सगळे शहर
सगळी संस्कृती गाडली गेली-
आणि कित्येक वर्षानंतर
एखाद्या उत्खननात सापडली,
तर असे आवरलेले घर पाहून
त्यांना कसे वाटेल?
आपले पूर्वज सभ्य होते?
आणि काल रात्रीच गाडले गेले असते तर?
अविकसित, पथभ्रष्ट आदिमानव
अस्तित्वात होते
अशी नोंद एखाद्या शास्त्रज्ञाने केली असती !…

मग मी दार खिडक्या घट्ट लावून घेतो
आणि युद्ध पातळीवर आवराआवरीला लागतो…
टेप बंद, फॅन बंद, कॉईलचे पिंप बंद…

काल रात्री माझ्या दोन जीवलग मित्रांनी
एकमेकांची गचांडी धरली…
( मी खसखसा जमीन पुसू लागतो!)

काल एक आनंदी चेहर्‍याचा माणूस
का कुणास ठाऊक
हमसाहमशी रडू लागला…
( मी चूरगाळलेली चादर स्वच्छ अंतरतो!)

अगदी नाहीच राहवले तेव्हा
एकाने काल मला सांगितलेच-
मी तुझा हेवा करतो आणि द्वेषसुद्धा
( मी चेहर्‍याला कडक इस्त्री मारतात
तशी कपड्याला मारू लागतो!)

तिच्या सार्‍या आठवणींना केले होते ताडीपार
त्या सार्‍या काल आल्या, नग्नावस्थेत घरभर नाचल्या
मला सहन झाले नाही,
सिंडरेलाच्या बुटासारखे त्यांचे एक एक वस्त्र
पडले आहे पापण्यांत,
पण मी ते गुंतावल्यासारखे बाल्कनीच्या खाली
टाकून देईन…

सारे भराभरा करायचे रिकामे…
स्वच्छ घासायची भांडी…
स्वच्छ चेहरे... स्वच्छ डोळे…
सारे कसे स्वच्छ सुंदर
सारे कसे जागच्या जागी
सारे कसे आलबेल
सारे कसे शांत शांत…
जणू काही घडलेच नाही काही असे…
जणू काल विसरलीच रात्र घरात यायचे असे…
तिसर्‍या घंटेपूर्वी घरात आवरून,
दबा धरून बसावे असे…

…हं…आता उघडतो दारं,उघडतो खिडक्या…
थोडा वारा येऊ दे... थोडं उन्ह येऊ दे…
छान…
या…
आता तुम्हालाही आत यायला हरकत नाही!...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment