जरा मानवी स्पर्श होवो तुलाही
जरा आज तू बोल माझ्याकडे
जरा पातळी आज तू गाठ माझी
जरा आज तू धाव धरणीकडे
तुला ऐकू येते मला हे कळू दे
प्रचिती तुझी आज येउच दे
मी पायर्या लक्ष आलो चढोनी
तू पायरी एक उतरून ये!
तुला गाठण्याला किती मारल्या मी
उड्या उंच; अस्पर्श तू पाहिला
पहा शुष्क झाल्या दयाळा नद्या या
परी मेघ परकाच रे राहिला!
तुझ्या पायी वर्षे, युगे वाहतो मी
पुरेपूर दु:खांस स्वीकारतो
क्षणास येवो तुझा शब्द ऐकू
तयासाठी घे जन्म भिरकावतो!
जरि बुद्धी खोटी, जरि गर्व मोठा
तरि आत उत्सुकता रे तुझी
कृपाळा, तुझे नाव ऐकून आहे
वेड्या अडाणी तुकोबामुखी!!
-संदीप खरे
No comments:
Post a Comment