Sunday, August 22, 2010

आम्हा गरीबांघरी

आम्हा गरीबांघरी पानापानाचा नव्हे,
घासाघासाचा हिशोब चालतो

पदर आवळून घ्यावा कुळवंताच्या लेकीने
तशा चापूनचोपून घेतो सार्‍या इच्छा
घेरून येताना संध्याकाळचा उत्तान अंधार
सज्जनपनाच्या म्हणत परवचा
क्षीण मिणमिणत्या दिवलीभोवती
प्राणांची ओंजळ धरतो...

दोन वेळ पेटत्या चुलीची धग
वरदान म्हणून स्वीकारतो
लाल केशरी ज्वाळांच्या प्रकाशात
रसरसून उठलेल्या भुकेच्या गाठींमध्ये
जगण्याचा शाप विसरून जातो...

एखाद्याच्या मनीचे आर्त
सहज सन्मानित होते इथल्या भिंतीतून
एखाद्याचे अपयश सहज सहज सामावते
आकाशरंगी मनाच्या अवकाशातून
भेगाळल्या भुईवर पडावे पावसाचे पाणी
तसाच हारल्या पाठीवर थरथरता हात पडतो...

सहज स्वीकारतो आम्ही आमचे चेहरे
लावून घेतो छंद जगात राहण्याचा!
जन्मजात येते जगाकडे त्रयस्थ बघण्याची दृष्टी
श्वासाश्वासाला येतो गंध मुकाट शहाणपणाचा
चंद्रमौळी घराच्या फुटक्या कौलांतून
थेट अंगावर उतरते नियतीचे चांदणे
कुडकुडत्या शरीरांवर
उबदार शालीसारखे तेच नखशिखांत पांघरतो...
आम्हा गरीबांघरी पानापानाचा नव्हे,
घासाघासाचा हिशोब चालतो

-संदीप खरे

No comments:

Post a Comment